भारतातील १२४ वर्षे जुन्या गोदरेज समूहाच्या साम्राज्याचे अखेर विभाजन होणार आहे. सुमारे ४ अब्ज डाॅलरहून अधिक मूल्य असलेल्या या समूहाची दाेन भावांमध्ये वाटणी केली जाणार आहे. ही वाटणी साैहार्दपूर्ण करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले.
कुलुपे, साबणापासून घरगुती उपकरणे ते रिअल इस्टेटपर्यंत गाेदरेज उद्योग समूह पसरला आहे. मात्र, या अवाढव्य उद्याेग समुहाचे अखेर विभाजन होणार आहे. दाेन पैकी एक भाग आदी गाेदरेज आणि त्यांचे भाऊ नादिर यांना मिळणार आहे, तर दुसरा हिस्सा जमशेद गाेदरेज आणि स्मिता गाेदरेज कृष्णा यांचा असेल.
सध्या ७९ वर्षीय आदी गाेदरेज हे गोदरेज समूहाचे अध्यक्ष आहेत, तर नादिर गाेदरेज हे ‘गाेदरेज इंटस्ट्रीज’ आणि ‘गाेदरेज ॲग्राेवेट’च्या अध्यक्षपदावर आहेत. आदी आणि नादिर यांचे जमशेद हे चुलतभाऊ आहेत. ते ‘गाेदरेज ॲण्ड बाॅयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड’चे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, उद्योग समुहाच्या विभाजनाबाबत गोदरेज कुटुंबाचे निकटवर्तीय बँक व्यावसायिक निमेश कंपानी आणि उदय काेटक यांच्यासह अनेक कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
सुरुवातीला व्यवसायात अपयश
भारतात १८९७ मध्ये व्यवसायाने वकील असलेले अर्देशिर गाेदरेज यांनी ‘गाेदरेज समूहा’ची स्थापना केली हाेती. सुरुवातीच्या काळात यशाने त्यांना हुलकावणी दिली. मात्र, नंतर कुलुपांच्या व्यवसायाने त्यांना सावरले. नंतर त्यांची विविध उत्पादने बाजारात आली नि समूहाचा विस्तार झाला.
उद्योग समुहाच्या विभाजनाबाबत दिलेल्या निवेदनात गाेदरेज कुटुंबाने म्हटलंय, की शेअरधारकांचे हित सुनिश्चित करण्यासाठी गाेदरेज परिवार समूहासाठी काही वर्षांपासून दीर्घकालीन याेजनेवर काम करीत आहे. याचाच भाग म्हणून आम्ही बाहेरील भागदारांकडून सल्ला मागितला आहे.
गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपन्या
गाेदरेज ॲण्ड बाॅयस मॅन्युफॅक्चरिंग, गाेदरेज कन्झ्युमर प्राॅडक्ट्स लिमिटेड, गाेदरेज ॲग्राेवेट, गाेदरेज प्राॅपर्टीज आणि गाेदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड. याशिवाय पर्यावरण, आराेग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या २३ ट्रस्टमध्ये समूहाच्या प्रवर्तकांची २३ टक्के हिस्सेदारी असल्याचे समजते.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511