SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लहान मुलांना बाईकवरुन नेताना स्पीड लिमिट पाळावी लागणार, मोदी सरकारकडून नवी नियमावली..!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. आपल्या चिमुरड्यांना दुचाकीवरुन नेताना पालकांना आता विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे, अन्यथा पालक कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात..

केंद्रीय मोटर वाहन नियमावलीतील नव्या तरतुदींसह केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयानं पारित केला आहे. त्यात अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, दुचाकीवर मागे लहान मूल बसलेले असल्यास, दुचाकी 40 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने चालविता येणार नाही.

Advertisement

मुलांना ‘क्रॅश हेल्मेट’ अनिवार्य
दुचाकीचा वेग 40 किमीपेक्षा वाढल्याचे आढळून आल्यास वाहतूक नियमांचं उल्लंघन समजून कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच, 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना ‘क्रॅश हेल्मेट’ घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे..

भारतीय मानक ब्युरो (BIS)ने मान्यता दिलेले हेल्मेट लहान मुलांसाठी वापरता येणार आहे. बीआयएसच्या मार्गदर्शक तत्वांशी हेल्मेटचा दर्जा नसल्यास दुचाकीचालकावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येते..

Advertisement

दुचाकीचालकास 1000 रुपये दंड
नव्या वाहतूक नियमानुसार ४ वर्षांपेक्षा मोठे मूल दुचाकीवर बसलेले असल्यास त्याला प्रवासी मानले जाणार आहे. दुचाकीवर जास्त माणसांसोबत मूल बसलेले असल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

रस्ते अपघातात लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये रस्ते अपघातात 11,168 मुलांचा मृत्यू झाला. 2018 च्या तुलनेत मुलांच्या मृत्यूच्या प्रमाण 11.94 टक्के, म्हणजे 1191 एवढे वाढलेय..

Advertisement

दरम्यान, या मसुद्याच्या नियमांबाबत कोणाला काही सूचना किंवा आक्षेप असल्यास ई-मेलद्वारे कळविता येतील, असे परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement