ब्रेकिंग : शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी..?, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराचे खळबळजनक दावे..
सध्या देशभर गाजत असणाऱ्या मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक बातमी समोर येतेय. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावी याने अभिनेता शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली होती, त्यात 18 कोटींवर डील झाली. त्यातील 8 कोटी रुपये एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांना, तर बाकीचे पैसे इतरांमध्ये वाटून घेण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी माध्यमांशी बोलताना केला.
आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईलदेखील साक्षीदार आहे. ते म्हणाले, की या प्रकरणात पंच म्हणून माझी कोऱ्या कागदांवरच सह्या घेतल्या होत्या. क्रुझवर रेड मारण्याच्या दिवशी किरण गोसावी याने ‘येलो गेट’जवळ बोलविलं होते.
त्यावेळी किरण गोसावी व सॅम डिसूझा यांच्यातील फोनवरील संभाषण मी ऐकलं होतं. ’25 कोटींचा बॉम्ब टाका, 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ,’ असं संभाषण या दोघांमध्ये झाल्याचा दावा साईल यांनी केली आहे.
माझ्या जिवाला धोका असल्याने सोलापूरला एका परिचिताकडे मी 10-12 दिवस राहिलो होतो. गोसावीचे काही व्हिडीओ लपून शूट केल्याचे साईल यांनी सांगितले.
घटनेच्या दिवशी नेमकं काय झालं..?
ते म्हणाले, की “कारवाईच्या दिवशी गोसावीने मला मुंबईला बोलावलं. त्याने सांगितलेल्या लोकेशनवर मी पोहोचलो असता, ते ‘एनसीबी’ कार्यालय निघाले. काही वेळाने तेथे गोसावी व एक एनसीबी अधिकारी आले. पाठोपाठ समीर वानखेडे आले. नंतर तिघेही दोन गाड्यांमधून निघून गेले.”
काही वेळाने ते परत आले, थोडं खाण्या-पिण्याचं सामान घेतलं आणि क्रूझच्या गेटवर पोहोचलो. हे सर्व २ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता घडलं. काही वेळाने गोसावीने काही फोटो पाठवून क्रुझवरील लोकांना मला ओळखण्यास सांगितलं. त्या १०-१२ लोकांपैकी मी एकाला ओळखू शकलो.
काही वेळाने त्या व्यक्तीला पकडल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्या व्यक्तीसह एकूण १३ जणांना पकडल्याचं गोसावीने सांगितले. तसेच त्याने पाठविलेल्या फोटोंमध्ये एक मुनमुन धमेचाही असल्याचे साईलने सांगितलं.
कोऱ्या कागदांवर सह्या केल्या..
आर्यनला रात्री १२ वाजता ‘एनसीबी’ कार्यालयात आणलं. पंचाच्या सह्या करण्यासाठी गोसावीने मला ‘एनसीबी’ कार्यालयात बोलावलं. तेथे एका ‘एनसीबी’ अधिकाऱ्याने मला कोऱ्या कागदांवर सह्या करायला सांगितल्या. मी त्यास नकार दिला असता, समीर वानखेडे यांनी ‘काही होणार नाही, तू सही कर..’ असं म्हटलं. त्यानंतर मी जवळपास १० कोऱ्या कागदांवर सह्या केल्याचा दावा साईलने केला आहे.
तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 ]