लडाखमध्ये भारत व चिनी जवानांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर भारत सरकारने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भारतीय युजर्सचा डेटा चोरी करीत असल्याच्या संशयातून अनेक चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली. त्यात भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टिकटाॅकचाही समावेश होता.
भारतात टिकटॉक (tik tok) मुळे अनेक सर्वसामान्य तरुण-तरुणी स्टार झाले होते. ‘टिकटाॅक स्टार’ म्हणूनच त्यांना ओळखले जात होते. टिकटाॅकवर व्हिडीओ बनविण्याचा ट्रेंड जोरात असताना, बाॅलिवूड अभिनेत्यांनाही त्याची भुरळ पडली होती. त्यापैकी एक अभिनेता म्हणजे, आपला मराठमोळा रितेश देशमुख..!
रितेश (Ritesh Deshmukh) आणि त्याची बायको जेनेलिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या ‘पोस्ट’च्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. टिकटाॅकवर बंदी येण्यापूर्वी इतरांप्रमाणेच रितेश व जेनेलियाची जोडी टिकटाॅक व्हिडीओ तयार करुन ते शेअर करीत असत.
टिकटाॅकवर बंदी आल्यानंतर आपल्याकडे काही जण धायमोकलून रडताना दिसले होते. त्यावेळी आपल्यालाही बेरोजगार झाल्यासारखे वाटत होते, असा खुलासा रितेशने केला आहे.
रितेश नेमकं काय म्हणाला..?
एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुख म्हणाला, की “लॉकडाऊन काळात टिकटॉकवर लहान व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. हा तो काळ होता, जेव्हा प्रत्येक जण कठीण काळातून जात होता. मग, आम्हाला वाटले आपण त्यांना हसण्यासाठी काही निमित्त देऊ या…!”
टिकटॉकवर बंदी घातली, तेव्हा बेरोजगार झाल्यासारखे वाटल्याचे सांगून रितेश म्हणाला, की “मला वाटले, की अरे देवा, मी आता काय करावे? जे काम तिथे होते, ते तर गेले. मग इन्स्टा रील आले… मी म्हणालो चला, रील आले, बरं झालं…”
चाहत्यांकडून मिळते मोठी पसंती
रितेश हा त्याची पत्नी जेनेलिया (Genelia)सोबत टिकटॉकवर बरेच व्हिडीओ बनवत. भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यावर त्याने इन्स्टाग्राम (Instagram)वर रील (reels) बनवायला सुरुवात केली. या जोडीच्या व्हिडीओंना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते.
दरम्यान, आदित्य सरपोतदारच्या आगामी ‘काकुडा’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात रितेश दिसणार आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिवाय, रितेश सध्या जेनेलियासोबत ‘लेडीज व्हर्सेस जेंटलमन’ या शोचा दुसरा सीजनही करीत आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511