T20 World Cup: भारताने सराव सामन्यात इंग्लंडला चारली पराभवाची धूळ, भारताच्या ‘त्या’ दोघांची झुंजार खेळी
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) जोरदार सुरुवात केली आहे. काल सोमवारी झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात इशान किशन (70) आणि के. एल. राहुल (51) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 7 विकेट आणि 6 चेंडू राखून इंग्लंडचा पराभव केला आहे.
इंग्लंडने दिलेलं 189 रनचं आव्हान भारताने 19 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं. ऋषभ पंतने विजयी षटकार मारत व नाबाद 29 धावा करत तर हार्दिक पंड्यानेही नाबाद 12 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. आता भारतीय संघ पुढील सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
इंग्लंडची फलंदाजी:
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 188 अशी धावसंख्या उभारली. जेसन रॉय (17), जोस बटलर (18) आणि डेविड मलान (18) हे इंग्लंडचे अव्वल तीन फलंदाज झटपट बाद झाले.
इंग्लंडकडून या सामन्यात जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तसेच मोईन अलीने नाबाद 43 धावांची खेळी केली. तसेच लिव्हिंगस्टोनने 30 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 188 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताची फलंदाजी:
सलामीवीर रोहित शर्माला या सामन्यासाठी विश्रांती दिल्याने भारताकडून 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राहुल आणि इशान यांना सलामीला खेळण्याची संधी मिळाली.
केएल राहुल आणि इशान किशन या दोघांनी अर्धशतके केली. केएल राहुलने 51 धावा करुन अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर त्याला मार्क वूडने बाद केले, तर इशान किशन 70 धावा करुन रिटायर्ड हर्ट झाला. तसेच विराट कोहली 11 धावांवर तर सूर्यकुमार यादव 8 धावांवर बाद झाले. मग रिषभ पंतने नाबाद 29 आणि हार्दिक पंड्याने 12 धावा करत भारताला सामना जिंकून दिला. भारताने 19 षटकात 3 गडी गमावत 192 धावा करुन हा सामना जिंकला. इंग्लंडकडून डेविड विली, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मार्क वूडने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडियासाठी पाकिस्तान आव्हान?
सोमवारी (18 ऑक्टोबर) पाकिस्तान आणि वेस्टइंडीज यांच्यात टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी पहिला सराव सामना पार पडला. या सामन्यात कर्णधार बाबर आजमने 41 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 50 धावा पूर्ण केल्या. फखर जमानने 24 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर नाबाद 46 धावांची खेळीच्या जोरावर विजय मिळवला. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान 24 ऑक्टोबरला होणारा सामना नक्कीच रोमांचक होईल यात शंका नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511