पाकिस्तानच्या बाबर आझमने दिलं टीम इंडियाला आव्हान, विराट कोहलीने दिले जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय घडलं..
टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) ‘रन’संग्रामाला आजपासून (ता. १७) यूएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) सुरुवात झाली. वर्ल्ड कप स्पर्धा सुरु झाली, साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागलेले असते, ते म्हणजे हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान सामन्यावर..!
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान फक्त आयसीसीच्या स्पर्धेतच एकमेकांसोबत खेळताना दिसतात. त्यामुळेच या दोन्ही संघांतील सामन्याला अनन्यसाधारण महत्व आलेले असते. टी-२० असो वा वन-डे वर्ल्ड कप, आतापर्यंत पाकिस्तानला कधीही भारताविरुद्ध विजय मिळविता आलेला नाही.
दरम्यान, येत्या २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे. मात्र, त्याआधीच दोन्ही देशातील क्रिकेट रसिकांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरवात केली आहे. मग त्यात खेळाडू तरी मागे कसे राहणार..? आता तर दोन्ही संघांचे कॅप्टनमध्येही वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले.
बाबर आझम काय म्हणाला..?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने म्हटले होते, की “यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताकडून कायम पराभूत होण्याचा पाकिस्तानाचा इतिहास बदलला जाईल. आम्ही गेल्या 3 वर्षांपासून ‘यूएई’मध्ये क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे आम्हाला तेथील परिस्थिती चांगलीच माहीत आहे.”
‘आम्हाला माहीत आहे की खेळपट्टी कशी असेल, तेथे फलंदाजाला कसे जुळवून घ्यावे लागते. सामन्यादिवशी चांगला खेळणारा संघच जिंकणार नि मला वाटते की यंदा आम्हीच जिंकणार…’ असा दावा बाबर आझमने केला आहे.
विराट कोहलीचं चोख प्रत्युत्तर
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने बाबर आझमला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. तो म्हणाला, “माझ्यासाठी हा सामनाही इतर सामन्यांसारखाच आहे. आम्हीच जिंकणार, असा दावा बाबरने केला असला, तरी मी असे दावे करण्यावर विश्वास ठेवत नाही..!
भारत-पाक सामन्याबाबत काही वेगळं वाटतं का, या प्रश्नावर विराट म्हणाला, की “मला कधी असं जाणवलं नाही. या सामन्याच्या तिकीटीसाठीची मागणी आणि विक्री जोरात सुरु आहे. माझ्याकडे अनेक मित्रही तिकीट मागत आहेत. मात्र, मला त्यांना नकार द्यावा लागतोय..”
“हा सामना आमच्यासाठी अन्य सामन्यांसारखाच आहे. हा सामना खिलाडू वृत्तीने खेळायला हवा आणि आम्ही तसंच खेळू. क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टीने हा सामना वेगळा असेल. मात्र, खेळाडूंसाठी हा एक इतर सामन्यांसारखाच एक सामना असेल,” असे विराटने म्हटलं आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511