‘बिग बॉस मराठी-3’ मध्ये (Bigg Boss Marathi-3) प्रवेश घेतल्यापासून एका स्पर्धकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते नाव म्हणजे, महाराष्ट्राच्या प्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलीला पाटील…
दरम्यान, ‘बिग बॉस’सारख्या शो-मध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील (Shivlila Patil) यांचे जाणंच अनेकांना रूचलं नव्हतं. त्यावरून सुरुवातीपासून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात येत होते. अखेर प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला यांनी शोला अर्ध्यावरच ‘राम राम’ केला..
‘बिग बाॅस’च्या घराबाहेर आल्यानंतरही वारकरी संप्रदाय, वारकरी संघटना शिवलीला पाटील यांच्यावर नाराज होत्या. शिवलीला जोपर्यंत वारकरी संप्रदायाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कीर्तनावर बहिष्कार घालण्याचा इशारा काही कीर्तनकार संघटनांनी दिला होता.
भावना दुखावल्याबद्दल माफी
अखेर एका वृत्तवाहिनीशी बोलताना, शिवलीला पाटील यांनी वारकरी संप्रदायासह वरिष्ठ कीर्तनकार व त्यांच्या चाहत्यांची भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली.
त्या म्हणाल्या, की ‘बिग बॉस मराठी-3’मध्ये जाण्याच्या माझ्या निर्णयामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल, तर मी सर्वांची माफी मागते. माझा मार्ग चुकला असेलही, पण हेतू शुद्ध होता. मात्र, यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा कोणताही निर्णय घेणार नाही..!’
कीर्तन केल्याप्रकरणी गुन्हा..
दरम्यान, शिवलीला पाटील यांनी माफी मागितल्यावरही त्यांच्या अडचणी काही संपलेल्या नाहीत. नवरात्रीनिमित्त देऊळगाव मही (बुलढाणा) येथील राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळातर्फे शिवलीला यांचे कीर्तन झाले.
जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने शिवलीला पाटील यांच्या कीर्तनास सुरुवातीलाच मोठा विरोध दर्शविला होता. पण, आयोजकांनी त्यांचा विरोध डावलून शिवलीला यांचे कीर्तन घेतले. विशेष म्हणजे, त्यांच्या कीर्तनासाठी गर्दीही झाली.
कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन गर्दी जमविल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511