SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्यनला अटक झाल्याने शाहरुख खानला फटका, मोठ्या कंपनीने शाहरुखशी संबंध तोडले..!

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान याला अटक केल्यामुळे बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला मोठा व्यावसायिक फटका बसला आहे. आर्यनच्या अटकेनंतर एका मोठ्या ब्रँडने शाहरुखसोबतचे नाते संपविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

या ब्रॅंडचे नाव म्हणजे, बायजू (BYJU’s).. या कंपनीने शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरुख खानकडे असणारा हा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता. मात्र, ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक झाल्यानंतर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होत होती.

Advertisement

‘बायजू’ कंपनीने आपल्या जाहिरातींसाठी शाहरुखला आगाऊ पैसे दिले होते. आगाऊ बुकिंग केलेले होते. मात्र, नुकसान सोसून कंपनीने शाहरुखच्या जाहिराती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याबाबत काहीही बोलण्यास ‘बायजू’ने नकार दिला आहे.

शाहरुख खान 2017 पासून ‘बायजू’चा ब्रँड अम्बेसेडर आहे. शाहरुखच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्यावर कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदाही झाला होता. एका वर्षांसाठी बायजू कंपनी शाहरुखला 3 ते 4 कोटी रुपये देत असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यावर सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. त्याचा कंपनीवर परिणाम होऊ नये, यासाठी बायजूने शाहरुखच्या जाहिराती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

बायजूला बदनामीची भीती
ड्रग्ज प्रकरणात आर्यनचे नाव आल्याने शिक्षणाशी संबंधित जाहिरातीत शाहरुखला दाखविणे कंपनीला अयोग्य वाटत होते. त्यामुळे कंपनीने शाहरुखच्या जाहिराती थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, ब्रँड अॅम्बेसेटर म्हणूनही शाहरुखशी संबंध तोडणार का, याबाबतची माहिती मिळालेली नाही.

Advertisement

जाहिरातींसाठी आगाऊ बुकिंग केलेले असल्याने सर्व जाहिराती थांबविण्यासाठी काही वेळ लागणार आहे. मात्र, आपला ग्रुप बदनाम होऊन टीकेला सामोरे जावे लागू नये, यासाठी ‘बायजू’ने हा निर्णय घेतल्याचे समजते.

शाहरुखकडे असणारे ब्रॅंड
सध्या शाहरुखकडे हुंडाई, एलजी, दुबई टुरिझम, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स जिओसारखे अनेक ब्रँड आहेत. मात्र, त्यात ‘बायजू’ हा महत्त्वाचा आणि मोठा ब्रँड होता. मात्र, या मोठ्या ब्रँडनेच पाठ फिरविल्याने शाहरुखचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement