SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फाटलेल्या नोटा बॅंकांमधून बदलता येतात.. ही प्रोसेस करा, तुम्हाला मिळतील पूर्ण पैसे..!

बऱ्याचदा कोणीतरी फाटकी नोट माथी मारते, मग ती खपवता खपवता आपल्या नाकीनव येते. कधी कधी एखादी नोट इतकी फाटलेली असते, की कोणीही ती स्वीकारत नाही. त्यामुळे अनेकदा अशी नोट फेकून देण्याची वेळ येते.

फाटलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेचे काय नियम आहेत? या नोटांचे काय करता येईल आणि अशी नोट चलनात कशी आणायची? आरबीआयच्या नियमांनुसार, तुम्ही बँकेत जाऊन फाटक्या नोटा बदलू शकता. अगदी अनेक तुकडे झालेली नोटही बॅंकेला बदलून देणे बंधनकारक आहे.

Advertisement

बँकेचा नियम काय सांगतो?
एटीएममधून फाटक्या नोटा मिळाल्यास, तुम्ही बॅंकेतून त्या सहज बदलू शकता. नियमावलीनुसार, कोणतीही सरकारी बँक अशा नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. बँकांना अशा नोटा स्वीकाराव्याच लागतात.

कोणत्या नोटा बदलून मिळतात..?
एखाद्या नोटेचे अनेक तुकडे झाले असले, तरी ते बँकेत बदलून मिळू शकतात. फाटलेल्या नोटेचा कोणताही भाग गहाळ झाला, तरी बँक ती नोट बदलून देऊ शकते. त्यासाठी तुम्हाला आरबीआयने जारी केलेला फॉर्म भरावा लागेल, जो सरकारी बँकेत सहज मिळतो.

Advertisement

पूर्णपणे फाटलेल्या, कापल्या गेलेल्या वा जळालेल्या नोटा मात्र फक्त आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच बदलता येऊ शकतात.

किती पैसे मिळतात..?
काही अपघातामुळे रोख रकमेची नासधूस होते. उदा. आगीत नोटा अर्धवट जळणे, उंदराने कुरतडणे आदी. अशा नोटांची संपूर्ण रक्कम मिळते का? असा प्रश्न पडतो, तर हे पूर्णपणे नोटेची स्थिती आणि नोटांच्या मूल्यावर अवलंबून आहे. हे गणित थोडं सोपं करुन पाहू.

Advertisement

समजा, 50 रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या नोटेचा सर्वात मोठा तुकडा, हा नोटेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर या नोटेच्या बदल्यात त्याचे पूर्ण मूल्य बँकेकडून मिळते. तसेच 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटेचा सर्वात मोठा तुकडा, त्या नोटेपेक्षा 80 टक्के किंवा जास्त असेल, तर तुम्हाला त्या नोटेच्या बदल्यात संपूर्ण रक्कम दिली जाते.

म्हणजेच नोटेचा 80 टक्के भाग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मात्र, जर 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटेचा सर्वात मोठा तुकडा, हा नोटेच्या 40 ते 80 टक्केच असेल, तर तुम्हाला त्या नोटचे अर्धेच मूल्य देण्यात येते.

Advertisement