SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : अखेर राज्यातील शाळा सुरु होणार, मुख्यमंत्र्यांनी दिली प्रस्तावाला मान्यता, कधीपासून होणार शाळा सुरु..?

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार, येत्या 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा सुरु होणार आहेत.

कोरोनामुळे गेल्या वर्षापासून शाळा बंद आहेत. ऑगस्टमध्येही शाळा सुरु करण्याचा घेतलेला निर्णय अल्पजीवी ठरला होता. चोहोबाजूने टीका झाल्यावर राज्य सरकारला काही वेळातच तो निर्णय स्थगित करावा लागला होता. तेव्हापासून शाळा कधी सुरु होणार, हा प्रश्न सतत विचारला जात होता.

Advertisement

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. राज्य बऱ्यापैकी रुळावर येत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. लहान मुलांसाठीही लस आलीय. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की खरं तर एक महिन्यापूर्वीच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या, पण काही अडचणी आल्या. मात्र, आता येत्या 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करणार आहोत. संबंधित जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जातील.

Advertisement

बऱ्याच जिल्ह्यात कोरोना संपल्यात जमा आहे. मात्र, पुन्हा कोरोना रुग्ण वाढल्यास शाळा सुरु वा बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असेल, असे कडू म्हणाले.

कोणते वर्ग सुरु होणार?
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, की आधी कोरोनामुक्त झालेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टास्क फोर्ससोबत चर्चेनंतर आता ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

शाळा सुरु करण्याअगोदर आजारी मुलांना कसं शोधायचं? त्यासंदर्भात टास्क फोर्स ट्रेनिंग देणार आहे. सोबतच पालकांनी काय काळजी घ्यावी, याबाबतही माहिती देणार असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

शाळा सुरू करण्यासाठीची जूनी नियमावली

Advertisement
  • शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  • शिक्षकांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
  • गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश देऊ नये.
  • कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या ठिकाणी दोन सत्रात शाळा, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेहे लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवून कोरोना चाचणी करणे.
  • विद्यार्थी कोविडग्रस्त आढळल्यास शाळा बंद करुन निर्जंतुकीकरण करावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार घ्वावेत.