छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘दी कपील शर्मा शो’ हा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमधील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे हा शो आणि त्यातील कलाकार नेहमीच चर्चेत असतात.
आताही हा शो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘द कपिल शर्मा शो’ विरोधात एफआरआय दाखल करण्यासाठी एकाने चक्क कोर्टात धाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. नेमका काय प्रकार घडला, जाणून घेऊ या..
‘द कपिल शर्मा शो’चा एक भाग १९ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला. या एपिसोडचा रिपीट टेलीकास्ट २४ एप्रिल २०२१ रोजी दाखविण्यात आला होता. या भागात काही कलाकार दारू पित अभिनय करीत असल्याचे दाखवलं आहे.
न्यायालयाच्या बदनामीचा दावा
विशेष म्हणजे, प्रत्येक बाटलीवर ‘दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे,’ असे लिहिलेले असतानाही काही कलाकारांनी सेटवर मद्यपान केल्याचे दाखविले. शोमध्ये न्यायालयाचा सेट बनवून एका पात्राला दारूच्या प्रभावाखाली वागताना दाखविले. त्यामुळे न्यायालयाची बदनामी झाल्याचा दावा वकिलांनी केला.
मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील वकिलांनी सीजेएम न्यायालयात याबाबत अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
शोमध्ये मुलींवर अश्लील कमेन्ट
वकिलांनी अर्जात म्हटलेय, की “सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘कपिल शर्मा’ शोमध्ये मुलींवर अश्लील कमेन्ट करण्यात येतात. एकदा शोमध्ये बेकायदा कोर्ट तयार करण्यात आलं आणि त्याठिकाणी काही कलाकारांनी दारू पिऊन अभिनय केला.”
कायदा आणि न्यायालयाचा हा अपमान असून, त्यामुळे कोर्टात कलम ३५६/३ अंतर्गत दोषींवर एफआयआर नोंदविण्याची मागणी करीत आहेत. ढिसाळपणाचे हे प्रदर्शन लगेच थांबविण्याची मागणी वकिलांनी केली आहे.
न्यायालयात करण्यात आलेल्या अर्जामुळे ‘दी कपिल शर्मा’ शो अडचणीत सापडला आहे. याबाबत कोर्ट काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.