भारतात सणासूदीचे दिवस सुरु होताच, अनेकांचे लक्ष ई-कॉमर्स कंपन्यांच्या सेलकडे लागलेले असते. त्यानुसार, फ्लिपकार्ट व अॅमेझॉन या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक फेस्टिव्हल सेलची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
अमेझाॅन (Amazon)ने आपला वार्षिक ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची, तर फ्लिपकार्ट (Flipkart)ने ‘बिग बिलियन डेज सेल-2021’च्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज सेल’ हा 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
दुसरीकडे अमेझॉनने त्यांच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली, तरी त्याचा टीझर जारी केला आहे. त्यात या सेल दरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टवॉचसह विविध वस्तूंवर मोठ्या सवलती मिळणार असल्याचे सांगण्यात आलेय.
अमेझाॅनच्या प्राइम मेंबर्ससाठी सेलमध्ये देण्यात आलेली ऑफर एक दिवस आधी मिळणार आहे. अमेझॉनची प्राइम मेंबरशिप मिळविण्यासाठी तीन महिन्यांसाठी 329 रुपये, तर एका वर्षासाठी 999 रुपये भरावे लागणार आहेत.
सेलमध्ये 10 टक्के सूट
दरम्यान, अमेझाॅनने ‘एचडीएफसी’ बँकेसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये विविध वस्तूंवर ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे 10 टक्के त्वरित सूट मिळणार आहे. शिवाय ईएमआय व्यवहारांवर त्वरित सूटही उपलब्ध असेल.
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँकच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के ‘इन्स्टंट डिस्काउंट’ मिळेल. पेटीएम वॉलेट आणि UPI ट्रान्झेक्शनद्वारे पेमेंट केल्यास एश्योर्ड कॅशबॅक मिळणार आहे.
सेलमध्ये शून्य टक्के इंटरेस्ट आणि प्रोसेसिंग फीवर नो-कॉस्ट ईएमआय मिळणार आहे. तसेच कोणत्याही चांगल्या स्थितीतील फोनच्या एक्सचेंजवर कमीत-कमी 2000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.