रशियातील पर्म विद्यापीठावर आज (ता. 20) दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर येतेय. विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर एका अज्ञात हल्लेखोराने अचानक गोळीबार सुरु केला. त्यामुळे एकच पळापळ सुरु झाली. विद्यार्थ्यांनी खिडक्या, छतावरून उड्या मारत धूम ठोकली. काही सभागृहातच लपले.
अचानक झालेल्या या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत. सुरक्षारक्षकांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात 18 वर्षीय हल्लेखोराचाही मृत्यू झाला. हल्ला करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर या हल्ल्याबाबत माहिती दिली होती, असे सांगण्यात येते.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विद्यार्थी-शिक्षक आपला जीव वाचविण्यासाठी छतावरुन, खिडक्यातून उड्या मारताना दिसत आहेत. त्या प्रयत्नात अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
An unidentified person has opened fire in one of the buildings of Russia’s Perm State University, leaving several people wounded, according to preliminary reports: Russian News Agency TASS
Advertisement— ANI (@ANI) September 20, 2021
दुसऱ्या एका व्हिडीओत, एक व्यक्ती मोठे हत्यार घेऊन विद्यापीठाच्या इमारतीत घुसताना दिसत आहे. पर्म शहर हे मॉस्कोपासून 700 मैल दूर आहे.
हल्लेखाेराला कंठस्नान घातले
रशियन मीडियानुसार, शूटरची ओळख पटली, असून 18 वर्षीय टीमूर बेकमॅनसुरोह (Timur Bekmansurov) असे त्याचे नाव असल्याचे समजते. सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात त्याचाही घटनास्थळीच गोळी लागून मृत्यू झाला.
रशियातील प्रसिद्ध पर्म विद्यापीठात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अचानक विद्यापीठात गोळ्यांचा आवाज सुरु झाल्याने घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी वाट फुटेल तिकडे धाव घेतली. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात अनेक जण गंभीर जखमी झाले.
हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात
विद्यापीठावरील या हल्ल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात विद्यार्थी आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीवरुन उड्या मारताना दिसत आहेत. हल्लेखोराने हा हल्ला का केला, याबाबत समजू शकले नाही.
सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोराचा हेतू धोकादायक होता. त्यांच्याकडे मोठी जीवघेणी हत्यारे होती. मोठी हानी करण्याच्या उद्देशानेच तो आल्याचे सांगण्यात येते. मात्र, तत्पूर्वीच त्याचा खात्मा करण्यात आला. याबाबत पोलिस अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.