विराट कोहलीचा टी-20 संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा, टी-20 वर्ल्ड कपनंतर होणार पायउतार, पुढचा कॅप्टन कोण, वाचा..
गेल्या काही दिवसांपासून ज्या बातमीची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर ती खरी ठरली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कपनंतर विराट कोहली संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे त्याने सांगितले.
विराट कोहलीचा वर्कलोड कमी करण्यासाठी त्याच्या कर्णधारपदाचा भार हलका करण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा होती; पण त्याआधीच आयपीएलच्या दुसऱ्या सत्राची तयारी करताना विराटने मोठी घोषणा केली.
सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करुन त्याने याबाबत माहिती दिली. त्यानुसार युएई आणि ओमान येथे होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा कॅप्टन म्हणून त्याची अखेरची स्पर्धा असेल. त्यानंतर तो केवळ वन-डे नि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे.
🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
Advertisement— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
विराटच्या नेतृत्वाखाली भारताने 45 टी -20 सामने खेळले. पैकी 29 सामने जिंकले, तर केवळ 13 सामन्यांत भारताचा पराभव झाला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयाची टक्केवारी 65.11 इतकी आहे. 2017 च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो टी–20 संघाचा कर्णधार बनला होता.
पुढचा कॅप्टन काेण हाेणार..?
यंदाची टी-20 विश्वचषक त्याची कर्णधार म्हणून पहिली आयसीसी टी-20 स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. दरम्यान, विराटनंतर टी-20 संघाचं कर्णधारपद आक्रमक फलंदाज रोहित शर्माकडे सोपवलं जाणार असल्याची चर्चा आहे.
विराटनं काय म्हटलंय…
गेल्या ८-९ वर्षापासून मी तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. गेल्या ५-६ वर्षांपासून मी नियमीतपणे कर्णधार आहे. माझा वर्कलोड लक्षात घेता, भारतीय संघासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये योगदान देण्यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचे विराटने म्हटले आहे.
यासंदर्भात मी जवळच्या व्यक्ती, कोच रवी शास्त्री, बीसीसीआयचे सचिव जय शहा, अध्यक्ष सौरव गांगुली, निवड समिती आणि रोहित शर्मा यांच्यासोबत चर्चा केली. भारतीय संघासोबत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा यापुढे देखील मी प्रयत्न करणार असल्याचे विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सुनील गावसकर भडकले..
विराटच्या निर्णयानंतर माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “भाजपनेही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यापूर्वी प्रक्रियेप्रमाणे बैठक घेतली होती. मात्र, गेल्या 4 वर्षांत एकदाही बीसीसीआयने ही प्रक्रिया पार पाडलेली नाही.
बीसीसीआय व सिलेक्शन कमिटीने कित्येक वर्षांत कॅप्टन कोण हे ठरवण्यासाठी बैठकच घेतलेली नाही. किमान फॉरमॅलिटी म्हणून तरी एक बैठक बोलवून कर्णधाराचं नाव सुचवून ते निश्चित करण्यात यायला हवं होतं. काही सेकंदांची ही प्रक्रिया झाली असती तरी चाललं असतं, असे ते म्हणाले.