SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात कार घुसली, कारचालकाला अटक, तपासात भलतंच आलं समोर..!

मुंबईतल्या साकिनाका परिसरात महिलेवरील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. १३) मुंबईतल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर परत निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अचानक अज्ञात मर्सिडीज कार घुसली.

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात कार घुसल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संबंधित कार ताफ्यातून बाजूला केली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं होतं.

Advertisement

पोलिस तपासात संबंधित कार चालक एक व्यापारी असल्याचे समोर आलेय. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षेत अडथळा आणल्याबद्दल व्यापाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने जामीनावर कार चालकाची तात्काळ सुटका देखील झाल्याचे समजते.

संबंधित व्यापारी कारमधून मलबार हिलच्या दिशेने जात होता. कानात इअरफोन्स घातलेले असल्याने, शेजारी मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असल्याची त्याला कल्पना आली नाही. लेन बदलून चुकून तो मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात घुसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Advertisement

माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही
दरम्यान, साकीनाका घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा, महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिलाविषयक गुन्ह्यांचा आढावा घेतला.

‘माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. राज्यातील महिला सुरक्षितच राहिल्या पाहिजे. त्यासाठी उपाययोजनांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी गृह विभागाला पूर्ण पाठबळ देण्यात येईल. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा, यासाठी प्रयत्न करा’, असे ठाकरे म्हणाले.

Advertisement

परप्रांतीयांची नोंद ठेवली जाणार
परराज्यातून महाराष्ट्रात येऊन गुन्हे करणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. इतर राज्यातून येथे येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते कुठून येतात, कुठे जातात, यांची माहिती ठेवावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement