SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीत बोट उलटली, एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले, तिघांचे मृतदेह हाती..

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीपात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, इतरांचा शोध सुरु आहे.

दशक्रिया विधीनिमित्त एकाच परिवारातील 11 जण काल (सोमवारी) श्री क्षेत्र झुंज येथे आले होते. काल दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज सकाळी हे सर्व नदीत फिरायला गेले असताना ही दुर्घटना घडली. अचानक बोट उलटून तिघांना जलसमाधी मिळाली, तर आठ जणांचा शोध सुरु असल्याचे समजते.

Advertisement

नेमकं काय घडलं?
अमरावती जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत श्री क्षेत्र झुंज ही निसर्गरम्य परिसर येतो. गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील एकाच्या दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक सोमवारी (ता. १३) श्री क्षेत्र झुंज येथे आले होते.

दशक्रिया विधीचा कार्यक्रम सोमवारी आटोपल्यानंतर हे एकाच कुटुंबातील ११ जण मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून, तो पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. महादेवाच्या दर्शनासाठी हे सगळे बोटीतून वर्धा नदीतून जात होते.

Advertisement

वर्धा नदीत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक नाव उलटून काही कळण्यापूर्वीच ११ जण पाण्यात बुडाले. आतापर्यंत नावाड्यासह एक महिला व एका चिमुकलीचा मृतदेह हाती लागला होता. मात्र, बोटीतील सर्वांनाच जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती मिळताच, मदत व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यात येत होता.

Advertisement

सापडलेले मृतदेह
– नारायण मटरे (वय 45, रा. गाडेगाव)
– वांशिका शिवणकर (वय 2, रा. तिवसाघाट)
– किरण खंडारे (वय 28, रा. लोणी)

बोटीतील इतर प्रवासी
– अश्विनी खंडारे (रा. तारासावंगा)
– वृषाली वाघमारे (रा. तारासावंगा)
– अतुल वाघमारे (रा. तारासावंगा)
– निशा मटरे (रा. गाडेगाव)

Advertisement

– अदिती खंडारे (रा. तारासावंगा)
– मोहिनी खंडारे (रा. तारासावंगा)
– पियुष मटरे (रा. गाडेगाव)
– पूनम शिवणकर (रा. तिवसाघाट)

क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत
नागपूर व अमरावती जिल्ह्याच्या संगमावर हे ठिकाण आहे. झुंज या पर्यटन क्षेत्रावर या महिन्यात हजारो भाविक येत असतात. नदीचे पात्र मोठे असल्याने तेथे बोटींग करण्यात येते. क्षमतेपेक्षा जास्त लोकं बोटीत बसल्यामुळे ती उलटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement