नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिने बेरोजगार भत्ता, मोदी सरकारकडून योजनेला वर्षभरासाठी मुदतवाढ..!
कोरोना काळात अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले. काहींचे उद्योग-धंदे बंद पडले. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, मोदी सरकारने अशा बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांना सरकार तीन महिने बेरोजगारी भत्ता देणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे (ESIC) अटल बीमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गंत औद्योगिक कामगारांना असा बेरोजगारी भत्ता दिला जातो. कोरोना काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती.
दरम्यान, या योजनेची मुदत यावर्षी 30 जून रोजी संपली. मात्र, सरकारने आता त्यास 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना काळात आतापर्यंत 50,000 हून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतलाय. कोणत्याही कारणांमुळे नोकरी गमावल्यास 3 महिन्यांसाठी 50 टक्के पगारावर हा बेरोजगारी भत्ता दिला जातो.
अटल बीमित कल्याण योजनेअंतर्गत नोकरी गमावणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाच हा लाभ मिळतो. जे कर्मचारी ESIC स्किम अंतर्गत कव्हर आहेत, म्हणजेच ESIC साठी योगदान म्हणून, ज्यांच्या मासिक पगारातून पैसे कापले जातात, अशा लोकांनाच सरकारकडून जास्तीत जास्त 90 दिवस ही मदत केली जाते.
कशी मिळते मदत..?
विमाधारक अंतिम नियोक्ताद्वारे दावा पुढे पाठविण्याऐवजी थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात दावा करू शकतात. त्यानंतर थेट ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
दरम्यान, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाची 185 वी बैठक झाली. त्यात अटल बिमा कल्याण योजनेस जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत अन्य निर्णयही घेण्यात आले. त्यात कर्नाटकातील हारहोली आणि नरसापूर येथे प्रत्येकी 100 खाटांची दोन नवीन ईएसआयसी रुग्णालये, केरळसाठी सात नवीन ईएसआयसी दवाखाने, तसेच पाच एकर जमीन संपादित करण्यास मान्यता देण्यात आली.