कधी काळी आपल्या लावणीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता राजकारणाच्या फडात उतरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे समोर येत आहे.
सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येत्या 16 सप्टेंबरला मुंबईतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
सुरेखा पुणेकर यांच्यासह इतर 16 कलाकारही या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याआधीही अभिनेत्री प्रिया बेर्डे, विजय भाटकर, आनंद शिंदे यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे.
मागील काही दिवसांपासून सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. स्वतः सुरेखा पुणेकर यांनीही जुलै महिन्यात विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती.
आमदारकीसाठी प्रयत्नशील
नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे काही महिन्यांपूर्वीच दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाच्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
देगलूर मतदारसंघातील रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठ इच्छूकांची भाऊगर्दी झालेली असताना, सुरेखा पुणेकरही या जागेसाठी इच्छुक असल्याचे समजते. त्यांनी स्वत: निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यावर बरीच चर्चा रंगली होती.
हातात घड्याळ बांधणार
दरम्यान, सुरेखा पुणेकर बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, यापूर्वी त्यांना पक्षाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तसे त्यांनी स्वतः बोलूनही दाखविलं होतं. मात्र, आता सुरेखा पुणेकर यांनी हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय फायनल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकिट देणार का, त्यांचा पक्षाला किती फायदा होणार, याची उत्तरे येणारा काळच देऊ शकेल..!