बिडी पिण्यासाठी 20 रुपये न दिल्याने कटरने गळा चिरुन मजूराची हत्या, दोन दिवसांत पोलिसांनी गुढ उकलले..!
नाशिकमधील पंचवटी परिसरात शुक्रवारी (ता. १०) रात्री धारदार शस्राने गळा चिरुन एकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. ऐन गणेशोत्सवात झालेल्या हत्येमुळे नाशकात एकच खळबळ उडाली. कोणताही पुरावा नसताना, नाशिक पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या हत्येचे गुढ उकलले.
पंडित उर्फ रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या, असे अटक केलेल्या 32 वर्षीय संशयित आरोपीचे नाव आहे. तर सुनिल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून, तो एक मजूर असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालं.
बिडी पिण्यासाठी पैसे न दिल्याने हत्या
नाशिकमधील पंचवटी परिसरातील रस्त्याने शुक्रवारी (ता.१०) रात्री सुनील जात होता. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपी लंगड्याने त्याच्याकडे बिडी पिण्यासाठी 20 रुपये मागितले, पण सुनीलने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने लंगड्याने धारदार कटरने सुनीलच्या गळ्यावर वार केला.
किरकोळ कारणातून झालेल्या या हल्ल्यामुळे सुनीलला सुरवातीला काय करावं, हेच कळत नव्हतं. मात्र, एक वार केल्यावरही आरोपी मागे लागल्याने सुनीलने तेथून पळ काढला. जिवाच्या आकांताने पळत त्याने काट्या मारुती पोलिस चौकीजवळील पेट्रोलपंप गाठला. तेथून संघवी मिलसमोर तो बेशुद्ध पडला.
आरोपी लंगड्याने काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला व नंतर तेथून निघुन गेला. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेतील सुनीलला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले.
अखेर गुढ उकलले
संबंधित हत्या नेमकी कोणी केली, याबाबत कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, पोलिस चौकीजवळील पेट्रोलपंपावर एक जण हात धुताना पोलिसांना दिसला. त्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, तो लंगड्या असल्याचे समोर आले.
पोलिसांनी आरोपी लंगड्याला तपोवनातील एका उद्यानातून अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; पण ‘पोलिसी खाक्या’ दाखविताच तो पोपटासारखे बाेलू लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नाशकातील पंचवटी पोलिस पुढील तपास करीत आहेत.