भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील अखेरचा पाचवा सामना आज दुपारी साडेतीन वाजता मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार होता. मात्र, टीम इंडियावर कोरोना संकट कोसळल्याने इंग्लड व भारतीय क्रिकेट बोर्डाने हा सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघ या मालिकेत 2-1 असा पुढे आहे. त्यामुळे कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी इंग्लडसाठी हा सामना महत्वाचा होता. मात्र, भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला आहे.
Following ongoing conversations with the BCCI, the ECB can confirm that the fifth LV= Insurance Test at Emirates Old Trafford, due to start today, will be cancelled.
— England Cricket (@englandcricket) September 10, 2021
Advertisement
इंग्लडविरुद्धच्या चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. त्यानंतर शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर शास्री यांच्या कायम संपर्कात असल्याने गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिल्डिंग कोच आर. श्रीधर हेही कोरोना पाॅझिटिव्ह आले.
ट्रेनिंग सेशनही रद्द
कोरोनाबाधित आलेल्या या सर्वांना हाॅटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, पाचव्या टेस्टच्या पूर्वसंध्येलाच भारतीय क्रिकेट संघाचे ज्युनिअर फिजिओ योगेश परमार यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणखी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं होतं.
हॉटेलच्या रुमबाहेर पडण्यावरही खेळाडूंना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पाचवी टेस्ट होणार की नाही, याबाबत शंका उपस्थित होत होत्या. त्यानंतर आजच्या दिवसाचा खेळ रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर काही वेळातच पाचवा सामनाच रद्द झाल्याचे इंग्लड क्रिकेट मंडळाने जाहीर केले.
खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
दरम्यान, टीम इंडियातील सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, या मालिकेनंतर आयपीएल, पुढे टी-२० विश्वचषक होणार आहे. अशा वेळी महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण होणे परवडणारं नाही. त्यामुळेच खबरदारी म्हणून पाचवा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान, कोरोनामुळे भारतीय संघ मैदानात उतरु शकत नसल्याचा उल्लेख ईसीबीच्या अधिकृत पत्रकात आहे. तसेच सामना रद्द झाला असला, तरी मालिका बरोबरीत सुटणार की भारताकडे चषक दिला जाणार, याबाबतची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.