अवकाश संशोधन हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. गेली 20 वर्षे अवकाश संशोधनात अतिशय मोलाची भूमिका कोणी बजावली असेल, तर ती म्हणजे अवकाश दुर्बीण ‘हबल’..! अवकाशातील ‘हबल’ने टिपलेली अचंबित करणारी छायाचित्रे पाहून आपण आजही थक्क होतो.
‘हबल’ ही तिच्या काळातली उच्च दर्जाची दुर्बीण असली, तरी सखोल अवकाश संशोधनात तिला बऱ्याच मर्यादा येत होत्या. त्यातूनच गेल्या शतकाच्या अखेरीस ‘हबल’पेक्षाही अधिक शक्तिशाली अवकाश दुर्बीणीची निर्मिती झाली. या नव्या दुर्बिणीचे नाव आहे, ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (जेडब्ल्यूएसटी)’…!
दिग्गज खगोल शास्त्रज्ञ ‘एडविन हबल’ यांच्यावरून ‘हबल’ला नाव दिले होते. तसेच ‘जेम्स वेब’ दुर्बिणीला अमेरिकन अवकाश संस्था ‘नासा’चे दिवंगत प्रशासक जेम्स ई. वेब यांच्यावरून नाव देण्यात आलंय..!
नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडा स्पेस एजन्सी यांनी संयुक्तरित्या ‘जेम्स वेब’ या अवकाश दुर्बिणीची निर्मिती केलीय. कॅलिफोर्निया इथे नुकत्याच या दुर्बिणीच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. ‘जेम्स वेब’च्या निर्मितीला २००५ मध्ये सुरुवात झाली; पण विविध कारणांनी तिला उशीर झाला.
१० अब्ज डॉलर्स खर्च
कोरोनामुळे काही महिने या दुर्बिणीचे काम बंद पडले होते. या दुर्बिणीच्या निर्मितीवर आतापर्यंत १० अब्ज डॉलर्स इतका खर्च आल्याचे सांगण्यात येते. विश्वातील पहिल्या दीर्घिकेच्या निर्मितीचे गूढ उलगडण्याची, अवकाशात दूरवर पाहण्याची अफाट क्षमता ‘जेम्स वेब’मध्ये आहे.
सगळ्या अडचणीतून मार्ग काढत, अखेर या दुर्बिणीला अवकाशात नियोजित ठिकाणी नेण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नासाने या दुर्बीणीच्या प्रेक्षपणाची तारीख जाहीर केलीय.
कधी होणार प्रेक्षपण..?
येत्या १८ डिसेंबरला सुमारे ६.५ टन वजनाच्या या ‘जेम्स वेब’ अवकाश दुर्बिणीचे फ्रान्समधील फ्रेंच गयाना या तळावरुन युरोपियन स्पेस एजन्सीच्या एरियन -५ या शक्तीशाली प्रक्षेपकाच्या साहाय्याने प्रक्षेपण केले जाणार आहे.
‘जेम्स वेब’ची वैशिष्ट्ये
– ‘हबल’पेक्षा 100 पट सक्षम
– हबलहून 3 पट मोठी
– 18 षटकोनी आरसे
– प्रत्येक आरशाचे वजन : 46 पौंड
– सूर्यकिरणांचा सामना करू शकणारे अत्युच्च दर्जाचे कॅमेरे
– टेनिसच्या मैदानाच्या आकाराची पाच थरांची ‘ढाल’ दुर्बिणीचे रक्षण करण्यासाठी सज्ज
– ६.५ मीटर व्यासाची, सोन्याचा मुलामा असलेली बेरेलियम धातूने तयार केलेली भव्य लेन्स.
– व्हीजीबल (दृश्य प्रकाश), इन्फ्रोरेड आणि अल्ट्राव्हालेट, अशा तीन प्रमुख तरंग लांबीच्या माध्यमातून अवकाशाचा वेध घेणार आहे.
अवकाशातील रहस्या्ंचा उलगडा होणार
अवकाशातील अनेक रहस्या्ंचा उलगडा या दुर्बिणीमुळे होणार आहे. विश्व निर्मितीबाबत आणखी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. पृथ्वीभोवती प्रदक्षिण घालणारी प्रसिद्ध अवकाश दुर्बिण ‘हबल’ चे काम ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ आणखी पुढे नेणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.