टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवनने त्याची बायको आयेशा मुखर्जी हिच्यापासून फारकत घेतल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत स्वत: शिखरने कोणतीही माहिती दिली नसली, तरी त्याची बायको आयेशाने सोशल मीडियावर घटस्फोटाबाबत ‘पोस्ट’ शेअर केली आहे.
2012 मध्ये शिखरने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या आयेशा मुखर्जी हिच्यासोबत लग्न केले होते. आयेशाचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या नवऱ्यापासून तिला दोन मुली आहेत. त्यानंतर 2014 मध्ये शिखर व आयेशाला जोरावर हा मुलगा झाला. मात्र, आता त्यांच्या 9 वर्षांच्या संसाराला तडा गेलाय.
शिखर व आयेशाच्या लग्नालाच शिखरचे वडील महेंद्र पाल धवन यांचा सक्त विरोध होता. शिखरच्या निर्णयावर ते फारसे आनंदी नव्हते. मात्र, त्यावेळी त्याची आई सुनैना धवन या शिखरच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे घरातील इतरांचा विरोध डावलून शिखरने आयेशासोबत सात फेरे घेतले होते.
मात्र, वर्षभरापासून (2020) त्यांच्या नात्यात दूरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. याबाबत दोघांनीही कमालीची गुप्तता पाळली होती. सोशल मीडियावरुन दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले होते. आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिखरसोबतचे सगळे फोटो काढून टाकले होते.
View this post on Instagram
Advertisement
घटस्फोट हा शब्दही घाणेरडा…
आपल्या घटस्फोटाबाबत आयेशाने इंस्टाग्रामवर लिहिलेय की, “जेव्हा मी पहिल्यांदा घटस्फोट घेतला, तेव्हा मी खूप घाबरले होते. मला असे वाटले, की आयुष्यात मी अयशस्वी झालेय. त्यावेळी मी खूप चुकीचे करीत असल्याचे वाटत होते. मी सर्वांना निराश केले आणि स्वार्थीदेखील असल्याचे वाटले.”
“मी माझ्या पालकांना निराश करीत आहे. मी माझ्या मुलांचा अपमान करीत आहे आणि काही प्रमाणात मला असे वाटले, की मी देवाचाही अपमान करतेय. ‘घटस्फोट’ हा एक अतिशय घाणेरडा शब्द आहे. हे माझ्यासोबत पुन्हा घडतेय. ते भयंकर आहे.”
एकदा घटस्फोट घेतल्यानंतर, दुसऱ्यांदा असे वाटले की माझ्याकडे बरेच काही आहे. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. त्यामुळे जेव्हा दुसरे लग्न मोडले, तेव्हा ते खूप वाईट होते. मी पहिल्यांदा ज्या भावनांमधून गेले, ते परत आले. शंभर पट भीती, अपयश आणि निराशा. याचा अर्थ काय?”
ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी पहिले लग्न
दरम्यान, किक बाॅक्सर असणाऱ्या आयेशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी झाले होते. त्यांना 2000 मध्ये आलिया, तर 2005 मध्ये रिया या मुली झाल्या होत्या. मात्र, त्यांचा संसारही फार काळ चालला नाही. त्यानंतर फेसबूकच्या माध्यमातून आयेशा शिखरच्या आयुष्यात आली होती.