SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नाशिकमध्ये रंगला अपहरणनाट्याचा थरार..! तपासात भलतंच आले समोर, पोलिसांनी लावला डोक्याला हात..

तो.. नाशिकच्या आसारामबापू आश्रमातील गोशाळेचा सेवक.. दोन दिवसांपूर्वी पंचवटीतील नागसेठिया पशूखाद्य दुकानात गायींसाठी खाद्य घेण्यासाठी गेला. मात्र, काही कळण्याआधीच एका कारमधून आलेल्या तीन-चार जणांनी उचलून त्याला गाडीत कोंबले नि पाहता पाहता ते पसार झाले…

दुकानदारांसह तेथील काही नागरिकांनीही हा थरार पाहिला. दिवसा-ढवळ्या गोशाळेच्या सेवकाचे अपहरण झाल्याची वार्ता शहरभर झाली. पंचवटी (नाशिक) पोलिसांनी लगेच गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरविली. मात्र, तपासात भलतंच समोर आले नि नाशिक पोलिसांना डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली.

Advertisement

नाशिक शहरातील या अपहरणनाट्याची जोरदार चर्चा रंगलीय. नेमका हा काय प्रकार होता, तपासात नेमकं काय समोर आले, पोलिसांवर अशी वेळ का आली, याबाबतचा रंजक किस्सा जाणून घेऊ या..

बातमीमागची बातमी..
गुजरातमधील साबरमती येथे 2009 मध्ये एकावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी संजीव किशनकिशोर वैद्य (मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल. मात्र, घटनेनंतर तो पसार झाला होता. गेल्या 12 वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.

Advertisement

जिवे ठार मारण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी संजीव वैद्य पोलिसांच्या नजरा चुकवित एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. एक-दीड वर्षांपूर्वी तो नाशिकच्या आसारामबापू आश्रमात आल्याचे आश्रमातील त्याचे सहकारी सांगतात. त्याच्यावर गोशाळेची जबाबदारी देण्यात आली होती.

अहमदाबाद पोलिस संजीव वैद्य याच्या मागावरच होते. तो नाशिकमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पंचवटीतील नागसेठिया दुकानात पशुखाद्य घेण्यासाठी तो नेहमी येत असल्याचे पोलिसांना समजले. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले..

Advertisement

अपहरणनाट्याचा उलगडा
पोलिसांच्या या कारवाईबाबत सगळेच अनभिज्ञ होते. त्यामुळे या घटनेपासून थरारक अपहरणनाट्याला सुरुवात झाली. हा सगळा थरार तेथील नागसेठीया दुकानाचे संचालक सुभाष नागसेठिया यांच्यासह काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिला होता.

भरदिवसा गो-सेवक संजीव वैद्य याचे अपहरण झाल्याने सारेच भयभीत झाले. पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कोणताही पुरावा हाताशी नसताना पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.

Advertisement

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. संपूर्ण रात्रभर पोलिसांचा तपास सुरु होता. नाशिक-मुंबई महामार्गावरील घोटी टोलनाका, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाक्यापर्यंत शोध घेण्यात आला.

पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून घटनेचा उलगडाही केला खरा.. मात्र त्यानंतर त्यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली. अपहरणकर्ते दुसरे-तिसरे कोणी नसून, अहमदाबाद क्राईम ब्रँचचे पोलिस अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्याचे समोर आले.

Advertisement

नाशिकमधील आसाराम बापू आश्रमात अनेक जण सेवा करतात. मात्र, त्यांची पार्श्वभूमी पाहिली जात नाही. संजीव वैद्य हा गुन्हेगार नसून, पोलिसांनीच त्याचे अपहरण केल्याचा आरोप आश्रमातील सेवकांनी केलाय.

नाशिक पोलिसांना मनस्ताप
दरम्यान, संशयित आरोपीला अटक करण्याआधी वा नंतर अहमदाबाद क्राईम ब्रँचच्या पथकाने नाशिक पोलिसांना तशी माहिती देणे गरजेचे होते. मात्र, ती माहिती न दिल्याने हे अपहरणनाट्य रंगले. त्यात नाशिक पोलिसांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement