राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यापासून विद्यार्थी-पालकांची प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. मात्र, कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा-काॅलेज कधी सुरु होणार, याबाबत प्रश्नचिन्ह असताना दिलासादायक बातमी समोर आलीय.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (ता. 7) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कॉलेज सुरु करण्याबाबत मोठी घोषणा केली. त्यानुसार आता येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा विचार असल्याचे मंत्री सामंत यांनी जाहीर केले आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसत आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात हटविण्यात आले आहेत. काही ठराविक जिल्हे सोडता राज्य बऱ्यापैकी अनलॉक करण्यात आलेले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शाळा-काॅलेज लवकर सुरु करण्याची मागणी पालकांमधून होत होती. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय
ते म्हणाले, की “राज्यातील सगळ्या जिल्ह्यांत एकाच वेळी कॉलेज सुरु केली जाणार नाहीत. त्या त्या भागातील कोरोनाची परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष कसे असेल, याचीही माहिती दिली जाईल.”
मंत्री सामंत यांनी जाहीर केल्यानुसार, कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यात कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही महत्त्वाचं आहे. काॅलेज सुरु करण्यापूर्वी राज्यातील सर्व महाविद्यालयीन तरुणांचे लसीकरण होणं आवश्यक आहे.