जगातील फिल्म इंडस्ट्रीत अनेक चित्रपट जेल ब्रेकवर (Jail Break) बनले आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये तुरुंगातील हिरो बाहेर पडण्याचा प्लॅन बनवतो आणि कडक सुरक्षा असूनही तो त्याच्या मिशनमध्ये यशस्वी होतो. इस्रायलमध्येही अशीच एक घटना घडली. यात बोगदा खोदून अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहातून सहा गंभीर गुन्ह्यातील कैदी फरार गेले आहेत.
इस्राईलमधील गिलबोआ तुरुंगात काय घडलं?
उत्तर इस्राईलमधील गिलबोआ तुरुंगातील ही घटना आहे. पोलिसांनी माहिती दिली की, तुरुंगातून पळून गेलेले सर्व सहा कैदी एकाच पोलीस कोठडीत होते. त्यांच्यापैकी पाच इस्लामिक जिहाद संघटनेशी संबंधित आहेत आणि एक त्याच्याशी संलग्न असलेल्या सशस्त्र गटाचा माजी कमांडर आहे.
उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगातून सुटण्यासाठी कैद्यांनी चक्क बाथरूममध्ये सिंकखाली हळूहळू काही दिवस एक बोगदा खोदत राहिले आणि निसटले. त्यांनी हे काम गंजलेल्या चमच्यांच्या मदतीने केल्याचं समजलं. ते अनेक दिवस बोगदा खोदत राहिले. हे कैदी एक एक करून येत आणि बोगदा खोदत असत, रोजचं आपलं आळीपाळीने खोदण्याचं काम झालं की बाहेर येऊन ते एकदम शांत व सामान्य कैद्यांसारखेच वागायचे. अत्यंत हुशारीनं आणि शांततेत हे काम केलं की कोणालाही याविषयी पत्ता लागू दिला नाही.
कैद्यांनी बाथरूममधून तुरुंगाच्या बाहेर एक बोगदा खोदला आणि सोमवारी तिथून पळ काढला. पोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, ‘कैद्यांचा तपास चालू झाला आहे. आला आहे. ते आता जवळच्याच इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक भागात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि पोलीस दल त्यांचा कसून शोध घेत आहेत. याशिवाय 400 कैद्यांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे.’
इस्लामिक जिहादने (Islamic Jihad) जेल ब्रेकबाबत आनंद व्यक्त करत, पळून गेलेल्या कैद्यांना नायक म्हटलं आहे. त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मिठाईचे वाटपही केले आहे. हमासचा प्रवक्ता फावदी बारहौम म्हणाला की, हा एक मोठा विजय आहे, हे इस्त्रायली तुरुंगात असलेल्या आमच्या शूर सैनिकांची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाचा पुरावा देणारी घटना आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews