नागपुरातील कन्हान नदीत आज सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे पाचही मृत तरुण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील बाराभाई मोहल्ला येथील रहिवाशी असल्याचे समजते.
सय्यद अरबाज (वय २१), ख्वाजा बेग (वय १९), सत्पहीन शेख (वय २०), अय्याज बेग (वय २२) व मोहम्मद आखुजर (वय २१, सर्व रा. दिग्रस, यवतमाळ) अशी या तरुणांची नावे आहेत.
यवतमाळमधील दिग्रस येथून 12 तरुण नागपुरातील अम्मा दर्गा येथे दर्शनासाठी आले होते. त्यातील 5 जण कन्हान नदीत पोहोण्यासाठी रविवारी (ता. 5) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उतरले होते.
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी जास्त होती. नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील एक तरुण सुरवातीला बुडाला. त्यानंतर एक-एक करुन पाचही तरुण नदीत बुडाले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत जुन्या कामठी संकुलात ही घटना घडली.
पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा
दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांत विदर्भात चांगला पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे युवकांचा शोध घेण्यात पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा येत आहे. मदतकार्यातील अडथळा लक्षात घेऊन पारशिवणीच्या तहसीलदारांनी ‘एसडीआरएफ’ पथकाला पाचारण केल्याचे सांगण्यात आले.