तो साधा काॅम्प्युटर ऑपरेटर.. पगार काय तर अवघा 5 हजार रुपये.. पण काही काळातच तो कोट्यवधीचा मालक झाला.. हाताखाली चक्क स्वत:चा पीए बाळगणाऱ्या या काॅम्प्युटर ऑपरेटरचे पितळ अखेर उघडे पडले. कामाच्या ठिकाणी त्याने कोट्यवधीचा फ्राॅड केल्याचे समोर आले नि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला..
राजस्थानातील भीलवाडा येथील शिक्षण विभागात ही प्रकार घडला. गोपाळ सुवालका, असे या आरोपीचे नाव आहे. अवघ्या 5 हजार रुपयांच्या पगारावर तो काॅम्प्युटर ऑपरेटर म्हणून भीलवाडा जिल्ह्यातील कोटडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खेडा राजकीय विद्यालयात काम करीत होता.
2007 ते 13 ऑगस्ट 2021 या काळात त्याने विभागातील कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली. मात्र, अत्यंत शिताफीने तो पैसे गायब करीत असल्याने, कोणालाही त्याचा संशय आला नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे बनावट आयडी कार्ड व पासवर्ड तयार करुन तो हा गैरव्यवहार करीत होता.
गोपाळ सुवालका याने त्याची पत्नी दिलखूश सुवालका हिचेही खोटी कागदपत्रे तयार करून तिला शिक्षिका केले होते. अफरातफर करुन जमविलेले पैसे तो बायकोच्याच खात्यावर ट्रान्सफर करीत होता. या पैशांतून त्याने दोन घरं, जेसीबी मशीन खरेदी केले.
गैरव्यवहाराच्या पैशातून त्याने वाहनाचा व्यवसाय सुरु केला. त्याचा पसारा थेट पंजाबपर्यंत पसरला होता. साधा काॅम्प्युटर ऑपरेटर असणाऱ्या गोपाळची ही प्रगती पाहून अनेक जण तोंडात बोट घालत. केवळ 5 हजार रुपयांची नोकरी असताना, त्याने स्वत:च्या भाच्यालाच पीए म्हणून ठेवलं होतं.
अखेर पोलखोल झाली..
अखेर आरोपी गोपाळ सुवालका याचे पितळ उघडे पडले. सर्वप्रथम 12 ऑगस्ट 2021 रोजी शिक्षण अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापकांनी गोपाळ याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात गोपाळने 12 लाखांचा फ्रॉड केल्याचे म्हटलं होतं.
पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता, सगळी पोलखोल झाली. 2007 पासून आतापर्यंत आरोपीने तब्बल 2 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.