देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचे उत्तर अखेर समोर आलेय.
राष्ट्रीय तपास यंत्रणा, अर्थात एनआयए (NIA) ने कोर्टात तब्बल 10 हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. त्यात सचिन वाझे याने स्फोटकांची गाडी अंबानी यांच्या घराबाहेर का ठेवली, याबाबतची कारणे नमूद केली आहेत. या चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर आलीय.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 24 फेब्रुवारी 2020 च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळून आल्यावर राज्यासह देशात एकच खळबळ उडाली होती. ही गाडी सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरेन यांची असल्याचे नंतर समोर आले.
दरम्यान, मनसुख हिरेन यांचा शोध सुरु असतानाच मुंब्रा रेतीबंदर भागात 5 मार्च रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या झाल्याचा दावा करीत ‘एनआयए’ने याप्रकरणी वाझेला अटक केली. अंबानी स्फोटकप्रकरण व मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात वाझे हाच मुख्य आरोपी असून, सध्या तो जेलमध्ये आहे.
कशासाठी केला हा आटापिटा..?
नव्वदच्या दशकात सचिन वाझे ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ म्हणून ओळखला जात होता. मात्र, ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ठाकरे सरकारने 2020 मध्ये त्याचा परत पोलिस दलात समावेश करुन घेतला. त्याला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट, अर्थात सीआयूचे (CIU) प्रमुखपदही दिले.
जवळपास 16 वर्षांनंतर सचिन वाझे पोलिस दलात परतला होता. त्यामुळे त्याला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांच्या गाडीचा तपास करुन, एक उत्तम तपास अधिकारी, असा लौकिक पुन्हा मिळेल, असे त्याला वाटत होते. त्यासाठीच त्याने हा सगळा डाव रचला. मात्र, हा डाव त्याच्याच अंगलट आला. भलतंच घडलं नि वाझे जेलमध्ये गेला.
कशा झाली मनसुख हिरेन यांची हत्या..?
मनसुख हिरेन यांचा हत्याकांडाचाही सगळा घटनाक्रम समोर आलाय. त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्तीने क्लोरोफॉर्म टाकले. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. नंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आलेय.
हिरेन यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी माराच्या खुणा होत्या. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला असल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.