‘कौन बनेगा करोडपती’, अर्थात ‘केबीसी-13’ च्या यंदाच्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरवात झाली. या सिजनच्या पहिल्याच ‘शानदार शुक्रवार’ भागात भारतीय क्रिकेट संघातील एके काळचे शानदार सलामीवीर सौरव गांगुली व विरेंद्र सेहवाग यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली.
सौरव गांगुली व विरेंद्र सेहवाग यांनी या शो-मध्ये टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील कधीही बाहेर न आलेल्या गोष्टी सांगितल्या. काही काळासाठी सौरव गांगुली शोचा अॅंकर झाला होता. त्याने अमिताभ बच्चन यांना हॉटसीटवर बसवून प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे बिग-बीही गोंधळून गेले होते.
नाणेफेकीचा किस्सा..
मैदानावरील किस्से सुरु असतानाच, अमिताभ यांनी सौरवला विचारले, की ‘आम्ही असं ऐकलंय की तुम्ही लोकांना खूप वेळ प्रतीक्षा करायला भाग पाडता..’ त्यावर सौरवने २००१ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील नाणेफेकीचा किस्सा सांगितला.
सौरव म्हणाला, की ‘नाणेफेकीसाठी मैदानावर जाण्याची वेळ आली, तरी मला ब्लेझर मिळालेले नव्हते. त्यामुळे मला दुसऱ्याचे जॅकेट घालून मैदानावर जावे लागले. मला उशीर झाल्याने स्टीव्ह वाॅ चिडला होता. नंतर आम्ही तो कसोटी सामना जिंकला. गुड लक असल्याचे समजून मग आम्ही मुद्दाम तसे करु लागलो.’
धोनीवरील प्रश्नावर अडखळले
पहिल्या 7 प्रश्नांपर्यंत गांगुली-सेहवागने एकही लाईफलाईन वापरली नाही. शोमध्ये त्यांनी 25 लाख रुपये जिंकले. दरम्यान, ट्रॅविस डॉलिन कोणत्या माजी भारतीय कर्णधाराची एकमेव आंतरराष्ट्रीय विकेट आहे?गांगुलीने सुनील गावस्करचे नाव घेतले, तर सेहवागने अझरुद्दीनचे..!
बऱ्याच गोंधळानंतर शेवटी त्यांनी तज्ज्ञाचे मत वापरण्याचा निर्णय घेतला. तज्ज्ञांनी त्यांना धोनीचे नाव सांगितले. ट्रॅविस डॉलिन 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळला होता. धोनीने या सामन्यात दिनेश कार्तिकला यष्टीरक्षण देऊन ही विकेट घेतली होती.
धोनीने नंतरही एक विकेट घेतली, पण पंचांनी ती मान्य केली नाही. अशा परिस्थितीत धोनीच्या नावावर एकच आंतरराष्ट्रीय विकेट आहे, ती म्हणजे ट्रॅविस डॉलिन. त्यावेळी गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता, तर सेहवाग दुखापतीमुळे ही स्पर्धा खेळू शकला नव्हता.
२५ लाखासाठीचा प्रश्न..?
आझाद हिंद रेडिओ ही रेडिओ सेवा १९४२ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली? A) जपान B) जर्मनी C) सिंगापूर D) बर्मा, असे चार पर्याय दिले होते. सौरवला या प्रश्नाचे अचूक उत्तर माहित नव्हते, मात्र सेहवागने या प्रश्नाचे अचूक उत्तर जर्मनी असल्याचे सांगून २५ लाख रुपये जिंकले.