अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज (ता. 4) जाहीर झाली. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश मिळालेल्या काॅलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागणार असल्याचे शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी सांगितले.
‘कट ऑफ’ नव्वदी पार
मुंबईतील नामंकित कॉलेजचा ‘कट ऑफ’ दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतरही नव्वदी पार असल्याचे दिसत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत नामंकित कॉलेजचा ‘कट ऑफ’ हा 1 टक्याने (4 ते 7 गुणांनी कमी) घसरला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई विभागातील 60,037 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत कॉलेज प्राप्त झाले आहे. मुंबई विभागातील 13,282 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. सायन्स शाखेतील 5125, कॉमर्स 37186, आर्टससाठी 17333 विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत कॉलेज मिळाले आहेत.
मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक विभागातील अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने सुरु आहे. पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली होती. त्यात संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यास सांगण्यात आलं होतं.
पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 31 ऑगस्टपासून दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. पहिल्या पर्यायाचे महाविद्यालय जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी सांगितले आहे.
जात प्रमाणपत्र नसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
दरम्यान, अकरावीत प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला. जात प्रमाणपत्र नसणारे विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करु शकतात, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती.