मारुती सुझुकी इंडिया.. देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी. मात्र, या कंपनीची कार तुमच्याकडे असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण मारुती सुझुकीच्या काही गाड्यांमध्ये सुरक्षेसंदर्भात काही दोष आढळून आला आहे. त्यामुळे या कंपनीने ग्राहकांकडून आपली वाहने परत मागविली आहेत.
मारुती सुझुकी इंडियाने देशभरातील ग्राहकांकडून परत मागविलेल्या या कारची संख्या आहे, तब्बल 1 लाख 81 हजार..! कंपनीने आपल्या पेट्रोल इंजिन प्रकारांतील 5 मॉडेलच्या कारमधील संभाव्य दोष शोधण्यासाठी आज (शुक्रवारी) हा रिकॉल ऑर्डर जारी केली आहे.
या माॅडेलच्या कारमध्ये दोष
याबाबत मारुती सुझुकी कंपनीने एक पत्रक जाहीर केलंय. त्यात म्हटलंय, की कंपनीने त्यांच्या सियाज (Ciaz), एस क्रॉस (S-Cross), विटारा ब्रेझा (Vitara Brezza), इर्टिगा (Ertiga) आणि एक्सएल-6 (XL-6) या पेट्रोल मॉडेल कार परत मागविल्या आहेत.
कंपनीत 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 दरम्यान या माॅडेलच्या कारची निर्मिती झालेली असावी. या गाड्या परत आल्यावर त्यांच्या ‘मोटर जनरेटेड युनिट्स’ची तपासणी केली जाईल. वाहनांत काही अडचण असल्यास, कंपनी ग्राहकांकडून कोणतेही पैसे न घेता, त्याची दुरुस्ती करुन देणार आहे.
वाहनातील खराब झालेले भाग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बदलले जातील. कारमालकांनी सध्या पाण्याच्या ठिकाणी वाहन नेऊ नये वा वाहनाच्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक भागांवर पाणी फवारु नये, असे आवाहन मारुती सुझुकीने केले आहे.
असे व्हा, रिकाॅल प्रक्रियेत सामील
आपली कार रिकॉल प्रक्रियेत तपासायची असल्यास मारुती सुझुकी आणि नेक्साच्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करावे. वाहनाचा मॉडेल क्रमांक टाकल्यावर तुमची कार या रिकॉल प्रक्रियेचा भाग आहे की नाही, याची माहिती समोर येईल. वाहनाच्या आयडी प्लेटवर चेसी क्रमांक आहे. वाहन चालान / नोंदणी कागदपत्रांतही नमूद आहे.
दरम्यान, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे सप्टेंबरमध्ये कंपनीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये एकूण उत्पादन सामान्य उत्पादनाच्या सुमारे 40% असू शकते, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.