विराट कोहली सापडला वादाच्या भोवऱ्यात, मैदानाबाहेरील कृत्यामुळे बजावली नोटीस, नेमकं काय झालं, वाचा..!
सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे मोठ्या संख्येने फाॅलोअर्स आहेत. आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर विविध पोस्ट करीत असतात. त्याला ‘इन्फ्लूएन्सर मार्केटिंग’ असे म्हटले जाते. त्या माध्यमातून सेलिब्रिटीचीही मोठ्या प्रमाणात कमाई होत असते.
सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी कोण असेल, तर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली. फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात किंग कोहलीचे फॅन्स आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या पाहिली, तरी हे सिद्ध होते. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विराटचे 14 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
साहजिकच इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून कमाई करणारा तो सर्वात श्रीमंत भारतीय आहे. एका प्रायोजित इन्स्टाग्राम पोस्टमधून (Sponsored) विराट तब्बल 5 कोटी रुपये कमावतो. दोन वर्षांपूर्वी विराटला एका पोस्टमधून 1.35 कोटी रुपये मिळत होते. जगातील टॉप 20 व्यक्तींमध्ये विराट हा एकमेव भारतीय आहे.
विराट कोहली नि वाद, हे काही नवे राहिलेले नाही. आता हा वाद मैदानापुरता राहिलेला नाही. इन्स्टाग्रामवरील अशाच एका पोस्टमुळे विराट नुकताच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नेमकं काय झालं होतं पाहू या..
नेमकं काय झालं..?
विराट कोहलीने गेल्या 27 जुलैला इन्स्टाग्रामवर तीन फोटो असणारी एक पोस्ट टाकली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा त्यात गौरव केला होता. मात्र, खेळाडूंचे कौतूक करताना विराटने एका विद्यापीठाचा उल्लेख केला होता.
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
पहिल्या फोटोमध्ये विराटने म्हटले होते, की “भारताने टोकियो ऑलिम्पिकसाठी पाठविलेल्या एकूण खेळाडूंपैकी 10 टक्के खेळाडू एकाच विद्यापीठातील आहेत. हा एक विक्रम आहे. आशा आहे की या विद्यापीठाचे विद्यार्थीही भारतीय क्रिकेट संघाचाही भाग होतील.”
विद्यापीठाचे पोस्टर पुढील दोन फोटोंमध्ये होते. त्यावर संबंधित 11 खेळाडूंची नावे होती. कोहलीने या इन्स्टा पोस्टमध्ये विद्यापीठाचे नावही नमूद केले होते. प्रत्यक्षात ही एक ‘पेड पोस्ट’ होती. विराटने ही पोस्ट टाकण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून पैसे घेतले होते.
भारताच्या जाहिरात नियामक अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) च्या नियमांप्रमाणे, एखाद्या सेलिब्रिटीने ‘पेड पोस्ट’ केली असेल, तर त्याने संबंधित पोस्ट जाहिरात कॅम्पेनचा भाग असल्याचे नमूद करायला हवे. विराटने तसा कुठेही उल्लेख केलेला नव्हता.
ही बाब समोर आल्यावर ‘एएससीआय’ (ASCI) ने विराटला नोटीस बजावली. त्यानंतर कोहलीने इन्स्टा पोस्ट एडिट करुन त्यात पार्टनरशिपचा टॅग लावला. त्यानंतर या वादावर पडदा पडला.