‘हे’ व्यायामही ठरतात आरोग्यासाठी धोकेदायक, अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर, नेमकं काय म्हटलेय वाचा..?
टीव्ही अभिनेता, बिग बाॅस फेम सेलिब्रिटी सिद्धार्थ शुक्ला याचे वयाच्या केवळ 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे निधन झाले. आपल्या फिटनेसबाबत सिद्धार्थ अत्यंत जागरुक होता. काटेकोर आहार, नियमित व्यायाम करीत होता. शिवाय तो तणावाखाली नसल्याचेही त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलंय.
इतक्या धडधाकट माणसाचा हृदयविकाराने मृत्यू व्हावा, हे कोणाला खरे वाटत नाही. शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईलच, पण यानिमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच, मग तो व्यायाम का असेना..! उत्तम आरोग्यासाठी अनेक जण व्यायाम करतात. मात्र, कधी कधी त्याचा अतिरेक होतो, नि काही व्यायाम जीवावर बेतू शकतात, हे एका अभ्यासातून समोर आलेय.
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारासह व्यायामाचा सल्ला दिला जातो. त्यासाठी कार्डिओ (Cardio) प्रकारातील खास व्यायाम सांगितले जातात. मात्र, असे व्यायाम करताना, योग्य काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
हृदयाचे स्नायू बळकट करण्यासाठी, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका टाळण्यासाठी रोज 150 मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाचा व्यायामाचा सल्ला दिला जातो. मात्र, उच्च तिव्रतेचे व्यायाम, अतिश्रमामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
अभ्यासात काय म्हटलेय पाहा..
‘सर्क्युलेशन’ (Circulation) नियतकालिकात हा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे. तसेच ‘यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अति व्यायामामुळे अचानक कार्डियाक अरेस्ट (एससीए-SCA) किंवा कार्डियाक डेथ (एससीडी- SCD) होऊ शकते.
धावपटूंवरील अभ्यासानुसार, धावल्यानंतर खेळाडूच्या रक्तात बायोमार्कर (Biomarker) आढळले. हे मार्कर सहसा स्वतःहून जातात, परंतु तिव्र गतीने शारीरिक हालचाली केल्यास हे मार्कर पुन्हा कार्यरत होतात नि हृदयाभोवती जाड भिंती निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात.
उच्च तिव्रतेच्या व्यायामामुळे कार्डियाक अरेस्ट किंवा हृदयाशी संबंधित समस्याग्रस्त लोकांना अचानक हार्ट अॅटॅकचा धोका असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. विनाकारण क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे घातकच असते. आनुवंशिक, हृदयासंबधीचे आजार असणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
*स्प्रेडइट वरील मतांशी सहमत असेलच असे नाही, व्यायामाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.