SpreadIt News | Digital Newspaper

अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..! ‘हे’ प्रमाणपत्र नसले, तरी मिळणार प्रवेश, शिक्षणमंत्र्यांनी काय म्हटलेय पाहा..?

शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर केली होती. अकरावी प्रवेशासाठीचे वेळापत्रकही जाहीर केले होते. त्यानुसार राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु असली, तरी काही कागदपत्रे नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यात अडचणी येत आहेत.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने सुरु आहे. अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून (ता. 1) सुरु होत आहे. मात्र, जातप्रमाणपत्र नसल्याने अकरावीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या.

Advertisement

राज्यातील विद्यार्थी-पालकांची अडचण लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
अकरावीला प्रवेश घेताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसले, तरी हे विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करुन प्रवेश घेऊ शकतात. त्यानंतर त्यांना 30 दिवसांत स्वतःचे जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

Advertisement

वडिलांचे जात प्रमाणपत्र वा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केल्याची पोहोच पावती सादर करुनही विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेता येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी 30 दिवसांच्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो.

Advertisement

दरम्यान, खुल्या प्रवर्गातून अकरावी प्रवेशासाठी अर्ज सादर करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नसल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी म्हटले आहे.

दुसरी फेरी आजपासून
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. पहिल्या यादीतील अकरावी प्रवेशाची मुदत काल (मंगळवारी) संपल्याने दुसरी फेरी आजपासून सुरु होत आहे.

Advertisement

असं पाहा महाविद्यालय अलॉट झालं का..?
– विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.
– नोंदणीच्या वेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा.
– लॉगीन केल्यानंतर तुमच्या प्रवेशाचा तपशील दिसेल.

– वेबसाईटवर ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’वर क्लिक करा.
– तुम्हाला महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्याचे नाव स्क्रिनवर पाहायला मिळेल.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement