SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाचा अंदाज: पुढील 3 ते 4 दिवसांत कोणत्या भागांना अलर्ट जारी? राज्यात पावसाचा जोर कसा असणार, जाणून घ्या..

राज्यात पावसाचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी (30 ऑगस्ट) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुंबईत तर सकाळपासून जोरदार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. औरंगाबादमध्ये पाझर तलाव फुटल्याची घटना घडलीय, तर चाळीसगावात पूर आला आहे.

छत्तीसगड राज्यावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये 3-4 दिवस पावसाचा जोर जास्त असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, ‘छत्तीसगडवर 30 ऑगस्टला कमी दाबाचे क्षेत्र आहे. 15 अंश उत्तरवर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी IMD पुढील 3-4 दिवसांसाठी काही इशारे देत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे.’

Advertisement

31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार

पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जवळपास 12 तासापासून पाऊस सुरू आहे. नाशिकमध्ये उद्यासाठी (1 सप्टेंबर) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सोमवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर लातूर आणि उस्मानाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण 100 टक्के भरलं असून ओव्हर फ्लो होत आहे.
चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये पाणी तुंबलं असल्याचं देखील दिसतंय. तर गिरणा आणि तितूर या दोन नद्यांना पूर आला आहे.

विदर्भात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला,यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस असेल तर नागपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांत मध्यम पाऊस असेल, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे. हिंगोली, नांदेड, बुलढाणा या जिल्ह्यातील काही भागांत पाऊस सुरू आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement