SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूचा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का..!

भारतीय क्रिकेट संघात जागा मिळविण्यासाठी आता मोठी स्पर्धा आहे. एका एका जागेसाठी दोन-तीन उच्च दर्जाचे खेळाडू तयार आहेत. मात्र, प्रत्येकालाच संधी मिळू शकत नाही. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी अनेकांनी दुसऱ्या देशाची वाट पकडली, तर काहींनी वाट पाहून थेट निवृत्तीच जाहीर केली.

अचानक निवृत्ती जाहीर करणाऱ्या या खेळाडूंच्या यादीत आणखी एका भारतीय अष्टपैलू खेळाडूचे नाव सामील झालेय. ते म्हणजे स्टुअर्ट बिन्नी..! या गुणी अष्टपैलू खेळाडूने आज (३० ऑगस्ट) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.

Advertisement

मागील अनेक वर्षांपासून स्टुअर्ट बिन्नी भारतीय संघातून बाहेर होता. 2016 मध्ये 37 वर्षीय बिन्‍नी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. रणजीसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करुन भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याचे जोरदार प्रयत्न सुरु होते.

मात्र, भारतीय संघात आता संधी मिळणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर त्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या निवृत्तीनंतर अनेकांनी त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

निवृत्ती जाहीर करताना स्टुअर्ट बिन्नीने म्हटलेय, की ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद होतो. कर्नाटकचे नेतृत्व करणे, संघासाठी ट्रॉफी जिंकणे माझ्यासाठी अभिमानास्पद होते. क्रिकेट माझ्या रक्तात आहे. मी या खेळाला परत काही देऊ इच्छितो..!’

दिग्गज भारतीय क्रिकेटर राॅजर बिन्नी यांचा स्टुअर्ट बिन्नी हा मुलगा. त्याने 2014 मध्ये न्‍यूझीलंड संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारताकडून खेळताना त्याने 6 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्व केले.

Advertisement

अतूट विक्रम
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत स्टुअर्ट बिन्नी याने असा रेकॉर्ड केला, की आजही तो अतूट आहे. 2014 साली बांग्‍लादेशच्या विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या 4 धावा देताना त्याने 6 विकेट घेतल्या होत्या.

स्टुअर्ट बिन्नीची कारकिर्द
स्टुअर्ट बिन्‍नीने 6 कसोटी सामन्यात 194 धावा व 3 विकेट घेतल्या. 14 वन-डेमध्ये 230 धावा व 20 विकेट त्याच्या नावे आहेत, तर 3 टी-20 सामन्यांत 35 धावा करताना त्याने 1 विकेट घेतली. तसेच 95 प्रथम श्रेणी सामन्यात बिन्नीने 4796 धावा व 148 विकेट घेतल्या आहेत.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement