‘शेत बघा आलंया राखणीला.. सोन्याचं घुंगरू गोफणीला..’ अशा प्रकारच्या गीतातून बळीराजाच्या अस्सल पारंपरिक हत्याराचे, म्हणजेच गोफणीचे महत्व सांगण्यात आलेय.
अश्मयुगापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या सैन्यानेही युद्धात गोफणीचा हत्यार म्हणून प्रभावी वापर केला होता. उमाजी नाईक यांच्या सैन्याने तर फक्त गोफणीच्या जोरावर इंग्रजांना ‘सळो की पळो’ केले होते.
जंगली पशू-पक्ष्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी गोफणीचा वापर करतात. मात्र, काळाच्या ओघात गोफण (स्लिंग) मागे पडत चालली होती. मात्र, आता हीच गोफण कला एक खेळ म्हणून पुढे आली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगाने गोफणीचा प्रसार होतोय. गोफणीचा समावेश चक्क खेळात करण्यात आलाय. हा खेळप्रकार ३६ देशांमध्ये पोहोचला आहे. भारतात अमॅच्युअर स्लिगिंग इंडिया फेडरेशनच्या माध्यमातून गोफण खेळ म्हणून विकसीत होत आहे.
अशी होते गोफण स्पर्धा
वैयक्तिक व सांघिक (५ खेळाडू) प्रकारांत गोफण स्पर्धा होते. त्यात १६ वर्षाखालील आणि १६ वर्षांवरील दोन गट असतात. ज्येष्ठ शेतकरीही स्पर्धेत खेळू शकतात. १६ वर्षांआतील गटात शॉर्टमध्ये १० मीटर व लाँन्गमध्ये २० मीटर, असा प्रकार आहे.
१६ वर्षांवरील गटात ३० मीटर प्रकार असतो. प्रत्येक खेळाडूला टार्गेटवर ५ हिट करावे लागतात. टार्गेट बॉक्स १.२० चौरस मीटरचा असून, आतील वर्तुळ ५० चौरस मीटरचे असते. जमिनीपासून १ मीटर उंचीवर ते लावले जाते. वर्तुळात दगड-चेंडू लागल्यास २ गुण, बोर्डला लागल्यास १ गुण मिळतो. सर्वाधिक गुण मिळविणारा विजयी ठरतो.
पुण्यातील भागवत क्रीडा संकुलात या खेळाचे मुख्यालय आहे. येथे तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. शिबिरे व ऑनलाइन कार्यशाळा घेतल्या जातात.
गोफण खेळाच्या आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय व एक विश्वकप स्पर्धा झाली आहे. स्पेनमध्ये १४ ते १७ ऑक्टाेबर २०२१ मध्ये दुसरी विश्वकप स्पर्धा होणार असून, तीत ३४ देशांचे संघ सहभागी हाेणार आहेत.
गोफण खेळाचे साहित्य
गोफण ही सुताच्या दोरीपासून तयार केलेली असते. तिची लांबी १.५ ते २ मीटर असते. चेंडू व दगड, असे खेळाचे दोन प्रकार आहेत. टेनिस बॉलचे वजन ५६-५८ ग्रॅम, तर नदीतील गोट्याचे वजन १२८-१३० ग्रॅम असते. साहित्याचा सगळा खर्च अवघा ३०० रुपयांपर्यंत येतो.
अमॅच्युअर स्लिगिंग इंडिया फेडरेशन कार्यकारी संचालक कुंडलिक कचाले म्हणाले, की गोफण ही शिवकालीन युद्धकला असून, हा पारंपरिक वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याला खेळाचे स्वरूप आल्याने ही कलाप्रकार आता आणखी प्रसिद्ध होईल. शेतकरी व त्यांच्या मुलांना त्याचा फायदा होईल.