SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ओबीसी आरक्षणाबाबत मोठी अपडेट..! ठाकरे सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय, बैठकीत काय ठरले पाहा..

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज (ता. २७) एक मोठी बातमी आहे. राजकीय ओबीसी आरक्षणाला कोणाचाही विरोध नसल्याने, ते कायम ठेवण्यावर सर्वपक्षांचे एकमत झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत या निर्णयावर एकमत झाले. आता यासंदर्भात पुढील शुक्रवारी (ता. ३ सप्टेंबर) पुन्हा बैठक होणार आहे.

Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय ‘ओबीसी’ आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले होते. त्यानंतर राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी विरोधी पक्षांसह राज्य सरकारचा प्रयत्न सुरु आहे. आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

दरम्यान, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नसल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. ओबीसी आरक्षण होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, असे फडणवीस यांनीही म्हटले आहे.

Advertisement

इम्पेरिकल डेटा मिळविण्याचा प्रयत्न
बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, की केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. दुसरीकडे कॅबिनेटमध्येही त्यावर चर्चा झाली. मात्र, ही माहिती सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कानावर घालण्यासाठी ही बैठक घेतली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या तरी चालतील, पण त्यावर तोडगा काढण्यावर सर्वांचे एकमत झालं. 50 टक्के आरक्षणावर गेल्यास त्याला कोर्ट नि इतर गोष्टी आहेत. त्यामुळे त्यास जास्त वेळ जाऊ शकतो. आम्ही आरोप-प्रत्यारोपावर बोलणार नसल्याचे भुजबळ म्हणाले.

Advertisement

नाना पटोले म्हणाले, की ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नातून कसा मार्ग काढायचा, यावर चर्चा झाली. राज्यातील 20 जिल्ह्यांत आरक्षण कायम राहणार आहे. उर्वरित 16 जिल्ह्यांत आरक्षण कमी-जास्त होऊ शकेल. त्या जिल्ह्यांसाठी काय करता येईल, यासाठी पुढील शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे.

सर्वांच्या सूचनांचे स्वागत
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, यावर सर्वपक्षांचे एकमत आहे. त्यातील अडचणी दूर करण्यासाठी सर्वांच्या सूचनांचे स्वागत असल्याचे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी सगळ्या नेत्यांची मते बैठकीत जाणून घेतली.

Advertisement

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत, ही सर्वांचीच भावना असल्याचे ते म्हणाले. आजच्या बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसांत अभ्यास करून येत्या शुक्रवारी या संबंधात सर्व सहमतीने निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement