तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता भारत सरकारने आपली भूमिका मांडण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला (All-party meet today) आज काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे. या बैठकीदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय नेत्यांना अफगाणिस्तानात केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कारवाई, बचाव मोहीम यासंबंधी सविस्तर माहिती देणार आहेत.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरद्वारे सांगितले होते की, अफगाणिस्तानमधील घडामोडी पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाला राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री प्रल्हाद जोशी संसदीय कामकाजाबाबतचा अधिक तपशील देतील, असे ते म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीत काय होणार?
एस जयशंकर हे या बैठकीदरम्यान भारतामार्फत अफगाणिस्तानात सुरू असलेल्या बचाव मोहिमेबद्दल माहिती देतील. आतापर्यंत किती भारतीय भारतात परतले आहेत? आणखी किती जणांना अजूनही बाहेर काढायचे आहे? यावर सविस्तर चर्चा होईल. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन भारताने दिले आहे. भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये खूप गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तालिबान अफगाणिस्तान ताब्यात घेणार आहे, तेव्हा भारत सरकारची रणनीती काय असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
शरद पवारही बैठकीस उपस्थित..!
आज काही वेळापूर्वीच केंद्राच्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे संसदेत दाखल झाले आहेत. याचसोबत एचडी देवेगौडा व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा देखील या प्रमुख बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संसद भवनात दाखल झाले आहेत.
‘या’ विषयावर सर्वपक्षीय एकजूट राहावी…
“तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर मिळविलेल्या ताब्यावर (Afghanistan Taliban Crisis) आजच्या बैठकीत सर्व पक्षीय एकजूट राहायला हवी, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे”, असं राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. त्याचप्रमाणे, शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
जगात खळबळ माजवणाऱ्या तालिबानने अफगाणिस्तानमधील परिस्थितीत भारताने 16 ऑगस्ट रोजी आपल्या स्थलांतर आणि बचाव मोहिमेला सुरुवात केली असून आतापर्यंत 800 पेक्षा जास्त जणांना देशात आणलं आहे. ह्यात अनेक अफगाणी शीख आणि हिंदूंचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 400 भारतीय अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारताने अमेरिका, कतार, ताजिकिस्तान आणि इतर अनेक मित्र देशांशी समन्वय साधला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews