इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही गरमागरमी सुरुच..! सिराजने केली साऱ्यांची बोलती बंद, नेमकं काय झालं पाहा..?
भारताचा हा इंग्लड दौरा चांगलाच गाजतोय. लाॅर्डस् मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीत तर जोरदार गरमागरमी पाहायला मिळाली होती. त्यानंतर कालपासून (ता. 25) हेडिंग्ले येथे सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटीतही या वादाचे पडसाद उमटले.
भारतीय युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला इंग्लंडच्या प्रेक्षकांनी पुन्हा एकदा लक्ष्य बनविले. इंग्लंडच्या समर्थकांनी त्याला डिवचत चिडविण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांमधून कोणीतरी सिराजला चेंडू फेकून मारल्याचे विकेटकिपर ऋषभ पंत याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
Mohammed Siraj signalling to the crowd “1-0” after being asked the score.#ENGvIND pic.twitter.com/Eel8Yoz5Vz
— Neelabh (@CricNeelabh) August 25, 2021
Advertisement
सिराज बाऊंड्रीवर फिल्डींग करीत असताना, हा प्रकार घडला. लाॅर्डस कसोटीतही काही प्रेक्षकांनी के. एल. राहुल याच्यावर शॅंपेनचे कॉर्क फेकले होते. सलग दुसऱ्यांदा हा प्रकार झाल्याने कॅप्टन विराट कोहली चांगलाच संतापला होता. त्याने सिराजला प्रेक्षकांत ती वस्तू फेकण्यास सांगितलं.
या प्रकारामुळे कोहली नाराज झाला होता. ‘तुम्हाला जे हवं ते म्हणा, पण फिल्डर्सवर वस्तू फेकू नका. माझ्या मते हे क्रिकेटकरता ठिक नसल्याचे त्याने सांगितले.
सिराजने दिले जोरदार उत्तर..
कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला अवघ्या 78 धावांत बाद केले. त्यामुळे प्रेक्षक सिराजला भारताच्या स्कोअरवरुन वारंवार चिडवत होते. त्याला सिराजने हातवारे करीत जोरदार उत्तर दिले. सध्या स्कोअर 1-0 म्हणजेच, भारत मालिकेत 1-0 पुढे असल्याचे त्याने हातवारे करुन दाखविले.
भारताने कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळविला होता. मात्र, इंग्लंडला अजून एकही विजय मिळालेला नाही. सिराज हातवारे करीत असतानाचा, व्हिडीओ नि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, सध्याच्या मालिकेत 27 वर्षीय मोहम्मद सिराज भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या दोन कसोटीत 11 बळी घेतले. लॉर्ड्स कसोटीत भारताच्या विजयात त्याची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यात त्याने आठ विकेट घेतल्याने भारताचा विजय सुकर झाला होता.
ऑस्ट्रेलियातही सिराज लक्ष्य
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही सिराजला प्रेक्षकांच्या गैरवर्तणुकीला सामोरे जावे लागले होते. सिडनी कसोटीत काही प्रेक्षकांनी त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. याबाबत सिराज नि अजिंक्य रहाणे यांनी पंचांकडे तक्रार केल्यावर प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळीही मोठा वाद झाला होता.