SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : काबुल विमानतळावर भीषण बाॅम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू, अनेक नागरिक गंभीर जखमी, नेमकं काय घडलं वाचा..?

अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलमधील हमीद करझई विमानतळावर आज (ता. 26) दहशतवाद्यांनी केलेल्या बाॅम्बस्फोटात 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. या हल्ल्यात काही अमेरिकन सैन्यही मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याचे सांगण्यात येतेय.

काबुलमधील विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने हाच धोका खरा ठरलाय. या दुर्घटनेत विमानतळावरील अनेक नागरिकही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेदेखील या घटनेला दुजोरा दिला.

Advertisement

काबूल विमानतळाच्या गेटवर बॉम्बस्फोट झाल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव जॉन किर्बी यांनी सांगितलं. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यापासून जगभरातील नागरिक अफगाणिस्तान सोडत आहेत. त्यासाठी त्या त्या देशांकडून नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

काही दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं. यापूर्वीही ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेने आपण काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करणार असल्याचे जाहीर केले होते. इंग्लंडच्या गुप्तहेर सूत्रांनी याबाबत कालच (ता. २५) सतर्क केले होते.

Advertisement

विशेष म्हणजे, तालिबानला आता पूर्ण आंतरराष्ट्रीय मान्यतेची गरज असल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता नाही. मात्र, आयसीस, अल् कायदा, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद असा हल्ला करु शकतात, असे जाणकारांकडून सांगण्यात येते.

अफगाणिस्तान सोडण्यासाठी अनेक नागरिक काबूल विमानतळावर गर्दी करीत आहेत. या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठीच विमानतळाजवळ भीषण स्फोट झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवरून हा हल्ला किती भयंकर होता, याची कल्पना येते.

Advertisement

आत्मघातकी पथकाने हा बाॅम्बस्फोट घडवून आणल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या ‘पेंटॅगॉन’ने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्थानिक अफगाणी माध्यमांच्या वृत्तानुसार, किमान 10 जण या स्फोटात ठार झाले असून, अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement