आज संकष्टी चतुर्थी.. गणेश भक्तांसाठी मोठा दिवस.. संकष्टी म्हणजे अडचणींपासून मुक्ती..! श्री गणेशाला बुद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते. आपल्या भक्तांच्या समस्या गणपती दूर करतात. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते.
अनेक जण कोणत्याही शुभ कार्याची सुरवात गणेश पूजनानेच करतात. गजाननाचा आवडता बुधवार असल्याचे मानले जाते. त्यामुळे आजची (ता. 25) चतुर्थी आणखी फलदायी असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे. चला तर या संकष्टी चतुर्थीला गणेश पूजनाची पद्धत, मुहूर्त नि तिथीबाबत जाणून घेऊ या…!
हिंदू पंचांगानुसार आज (ता. २५) सर्वत्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जात आहे. मात्र, पंचांगानुसार, चतुर्थी तिथी आज सायंकाळी ४.१८ वाजता सुरू होणार आहे; पण दिवसा गणपतीची पूजा केली जात असल्याने चतुर्थीचा उपवास फक्त २५ ऑगस्टलाच ठेवता येणार आहे.
बुधवार गणेशाला समर्पित केलेला वार आहे. आजची चतुर्थी बुधवारी असल्याने गणेश उपासना अधिक फलदायी असून, या दिवशी गणेशाची पूजा केल्यास बुध ग्रहही मजबूत होऊ शकतो, असे पंचांगात सांगण्यात आले आहे.
असे करा गणेशपूजन
– संकष्टी चतुर्थीला गणेश पूजनासाठी प्रथम लाल आसनावर गणपतीची मूर्ती वा फोटो स्थापित करा.
– गणेशमूर्ती वा फोटोला सिंदूर टिळक लावा. धूप, दिवा, सुगंध, फळे आणि फुले अर्पण करा.
– गणपतीला दुर्वा नक्कीच अर्पण करावी. गणपतीला त्यांचे आवडते मोदक किंवा लाडू अर्पण करावेत.
– नंतर, गणपती मंत्र आणि स्त्रोतांनी गणपतीची स्तुती करा. गणपतीच्या आरतीने पूजेचा शेवट करावा.
या मंत्रांचा जप करा
विघ्नहर्त्या गणेश पूजनाने भक्ताच्या जीवनातून सगळी संकटे दूर होतात, म्हणूनच गणेश चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, असेही म्हणतात. या चतुर्थीला खालील मंत्रांचा जप करा.
- ‘ॐ गं गणपतये नम’ – जीवनात आनंद आणण्यासाठी मंत्र
- ‘ॐ वक्रतुंडाय हुं’ – संकटहारी मंत्र
- ‘ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा’ – रोजगार मिळविण्यासाठी मंत्र
- ‘ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा’ – जीवनातील कलह आणि अशांतता दूर करण्याचा मंत्र
- ‘ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा’ – सौभाग्य प्राप्ती करण्यासाठी मंत्र.