‘केबीसी’त 5 कोटी जिंकणारा आता कंगाल..! व्यसनाच्या आहारी गेला, लोकांनीही गंडा घातला, एक दु:खद कहाणी वाचा..!
‘कौन बनेगा कराेडपती’, अर्थात ‘केबीसी’.. जनसामान्यांना करोडपती होण्याचे स्वप्न दाखविणारा शो.. आपल्या ज्ञानाच्या बळावर इथे अनेकांनी नशिब आजमावले. त्यातील काहींचे करोडपती होण्याचे स्वप्न साकार झाले, तर काहींच्या हाती काहीच लागले नाही.
असे म्हटले जाते, की पैसा कमविणे अवघडच.. पण तो टिकवून ठेवणे, त्यापेक्षा अवघड..! आपल्या ज्ञानाच्या नि नशिबाच्या जोरावर या शोमध्ये करोडपती झालेले नंतर आपल्या ध्येयापासून भरकटत गेले नि पुन्हा रस्त्यावर आले. अक्षरक्ष: कंगाल झाले..!
बिहारचा सुशीलकुमारही त्यापैकीच एक. ‘केबीसी’च्या ५व्या पर्वात या सुशीलकुमारने चक्क ५ कोटी रुपये जिंकले होते. त्यामुळे या शोचे होस्ट नि महानायक अमिताभ बच्चन देखील बिहारच्या या तरुणाचे मोठे फॅन झाले होते.
घरात ५ कोटी रुपये आल्यावर या सुशीलकुमारचे जीवनच बदललं. खरंतर तेव्हापासूनच त्याचे वाईट दिवस सुरु झाले. आपल्या ‘फेसबूक पेज’वर सुशीलकुमारने लिहिलंय, की ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ५ कोटी रुपये जिंकल्यानंतरच त्याची वाईट वेळ सुरु झाली. काही दिवसांतच तो कंगाल झाला.
सुशीलकुमार लिहितो, की “५ कोटी रुपये जिंकल्यावर मी ‘लोकल सेलिब्रिटी’ झालो होतो. बिहारमध्ये ठिकठिकाणी महिन्याला १०-१५ शो करीत होतो. त्यामुळे माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. २०१५-१६ हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेले.”
“अनेक पत्रकार माझ्याबद्दल लिहित. माझी मुलाखत घेत. खरंतर त्यांच्याशी काय बोलावे, याचा कोणताही अनुभव नव्हता, पण मी बेरोजगार आहे, असे लोकांना वाटू नये, यासाठी मी माध्यमांना माझे बिझनेस नि इतर गोष्टी सांगायचो; पण काही दिवसांतच माझा बिझनेस तोट्यात येत होता.”
दारु, सिगारेटचे व्यसन लागलं
लोकांचे भले करण्यासाठी तो गुपचूप दान करीत होता. महिन्याला अनेक इव्हेंटला उपस्थित राहून त्यांना पैसे देत होता. या काळात त्याला अनेकांनी गोड गोड बाेलून फसविलं. मात्र, ते त्याला फार उशिरा समजलं. नंतर तर त्याला दारु नि सिगारेट पिण्याचे व्यसनही लागलं.
एके दिवशी त्याचे पत्नीसोबत भांडण झालं. त्याच वेळी त्याला इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने कॉल केला. त्यावेळी बोलण्याच्या ओघात त्याने ‘केबीसी’मध्ये जिंकलेले ५ कोटी रुपये संपले असून, दोन गायींचे दूध विकून घर चालवित असल्याचे सांगितले. ही बातमी देशभर झाली होती.
बाॅलिवुडमध्ये नशीब आजमावले
सुशीलला सिनेमांची मोठी आवड असल्याने सगळे सोडून तो मुंबईला आला. तेथे त्याने नशीब आजमावलं. सिनेमाच्या निर्मितीविषयी जाणून घेतलं. मित्रासोबत मुंबईत राहून त्याने तीन स्क्रिप्टही लिहिल्या. एका प्रोड्युसरने २० हजार रुपयांना त्या घेतल्या.
आता शिक्षक होणार
सिनेमा जमणार नसल्याचे लक्षात आल्यावर तो परत बिहारला परतला. आता त्याला शिक्षक व्हायचंय. त्यासाठी तो तयारी करतोय. ट्यूशनही घेतो. आता दारु नि सिगारेटचे व्यसनही सुटले आहे. आता तो पर्यावरण संवर्धनासाठीही काम करीत असल्याचे सांगण्यात आले.