अमेरिकी सेैन्याने माघार घेतल्यानंतर कट्टर दहशतवादी संघटना असणाऱ्या तालिबानने काही दिवसांतच अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर तालिबानींच्या भीतीने नागरिकांची देश सोडण्यासाठी धावपळ सुरु आहे. लाखो लोक असहाय झाले आहेत.
अफगाणिस्तानातील अनेकांना देश सोडायचा आहे. त्यातून काबूल विमानतळावर झालेल्या चेंगराचेंगरीत काहींना जीव गमवावा लागला. गोळीबारात काहींचा बळी गेला.
दरम्यान, एकीकडे अशी सगळी परिस्थिती असताना, अफगाणिस्तानातील एक प्रांत मात्र अद्यापही तालिबानींपासून स्वतंत्र आहे. या प्रांताचे नाव आहे, पंजशिर..! बंडखोरांचा बालेकिल्ला, अशीच त्याची ओळख आहे.
अफगाणिस्तानात २० वर्षांपूर्वीही तालिबानची राजवट असताना, पंजशीर प्रांतावर तालिबानला कब्जा करता आला नव्हता. आता पुन्हा एकदा पंजशीरने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती घडवली आहे.
तालिबानने काबुल ताब्यात घेतल्यावर लगेच आपले लक्ष पंजशीर खोऱ्याकडे वळविलं. मात्र, अमेरिकन बनावटीच्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या तालिबान्यांना पंजशीरमधल्या बंडखोरांनी जोरदार दणका दिला.
तालिबानने कारी फसीहुद दीन हाफिजुल्लाह याच्या नेतृत्त्वाखाली पंजशीरवर हल्ला करण्यासाठी शेकडो दहशतवादी पाठविले होते. काहीही करुन पंजशिर ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न होते.
मात्र, बगलान प्रांतातल्या अंदराब खोऱ्यात लपून बसलेल्या पंजशीरच्या बंडखोरांनी त्यांच्यावरच जोरदार प्रतिहल्ला चढविला. त्यात आतापर्यंत ३०० तालिबानी मारले गेले आहेत. त्यामुळे तालिबान्यांना मिळणारा रसद पुरवठा बंद झाला आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करण्यास सुरवात करताच, पंजशीर खोऱ्यात बंडखोर एकत्र येऊ लागले. त्यातील बहुतांश अफगाण राष्ट्रीय लष्कराचे सैनिक आहेत. त्यांचे नेतृत्त्व नॉर्दन अलायन्सचे प्रमुख राहिलेले माजी मुजाहिद्दीन कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करत आहेत.
दरम्यान, या सैनिकांसाेबत माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह आणि बल्ख प्रांताचे माजी गव्हर्नर यांची तुकडीदेखील आहे. पंजशीरमध्ये सध्या ९ हजार बंडखोर सैनिक असून, त्यांनी तालिबानींच्या नाकीनव आणले आहे.