‘ड्रायव्हिंग टेस्ट’मध्ये 31 टक्के लोक होतात फेल..! अहवालात महत्वाचे कारण आले समोर, चाचणीदरम्यान हे लक्षात ठेवा..
वाहनधारक वाहन चालविण्यास योग्य का, त्याने तसे प्रशिक्षण घेतलेय का, हे सुनिश्चित करण्याचे काम करते वाहनचालक परवाना, अर्थात ‘लायसेन्स’..! वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी ‘लायसेन्स’ आवश्यक असते, नाहीतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
‘ड्रायव्हिंग लायसन्स’ मिळविण्यासाठी प्रत्येकाला वाहन चालविण्याची परीक्षा द्यावी लागते, तीसुद्धा ‘आरटीओ’ (RTO)च्या मापदंडांसह..! मात्र, बरेच जण ही चाचणी पार करण्यात अपयशी ठरतात नि मग त्यांना पुन्हा पुन्हा चाचणीला सामोरे जावे लागते.
खरंतर चाचणीच्या वेळी वाहन चालविताना लोक सगळी खबरदारी घेतात, परंतु एक चूक नडते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अहवालात ही बाब समोर आली. चाचणी देताना नेमकी काय चूक होते, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, याबाबत जाणून घेऊ..
३१ टक्के लोक अपयशी
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरातील ‘आरटीओ’मध्ये चाचपणी केली असता, 31 टक्के लोक ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या चाचणीत अपयशी ठरल्याचे समोर आले.
विशेषत: चारचाकी वाहनाच्या चाचणीदरम्यान बरेच जण समोर वाहन चालविताना ते बरोबर डावीकडे-उजवीकडे वळवितात, पण रिव्हर्स घेताना चूक करतात. असे करणाऱ्यांची संख्या 31 टक्के आहे.
‘आरटीओ’चे नवे नियम, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ची चाचणी उत्तीर्ण होण्याच्या या टक्केवारीबाबत संसदेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली होती.
ते म्हणाले, की ‘ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्जदाराकडे 69 टक्के गुण असले, तरच तो पुढील परीक्षेसाठी पात्र होईल. अर्जदाराकडे काही विशेष कौशल्ये असणे आवश्यक आहे, जसे वाहन उजवीकडे-डावीकडे वा रिव्हर्स घेणे. मर्यादित अंतर उजवीकडे वाहन चालविणे, या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यास सांगितले होते.
‘ड्रायव्हिंग टेस्ट’बाबत व्हिडीओ
ड्रायव्हिंग टेस्टला सामोरे जाण्यापूर्वी आता अर्जदाराला एक व्हिडिओ लिंक दिली जाईल, त्यात ‘ड्रायव्हिंग टेस्ट’बाबत संपूर्ण माहिती असेल. शिवाय ‘ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक’वर एलईडी स्क्रीनद्वारे चाचणीचा डेमोही अर्जदाराला दाखवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.