कोराेना काळात नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा, मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घेण्यासाठी वाचा..
कोरोना महामारीमुळे अनेकांनी नोकरी गमावली. उद्याेग-धंदे ठप्प झाले. अनेकांवर कायमचे घरी बसायची वेळ आली. अशा कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारने रोजगार गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना माहिती दिली. त्या म्हणाल्या, की कोरोना संकट काळात अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अशा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात २०२२ पर्यंत पीएफचा हिस्सा केंद्र सरकार जमा करणार आहे.
“कोरोना काळात नोकरी गमावल्यानंतर, औपचारिक क्षेत्रातील छोट्या-छोट्या नोकऱ्यांसाठी पुन्हा बोलावलेलेच कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तसेच, या योजनेचा फक्त त्याच लोकांना फायदा होणार आहे, ज्यांची कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत आहे,” असे अर्थमंत्री सीतारमण यांनी स्पष्ट केले.
मनरेगाचे बजेट वाढविले
सीतारामन म्हणाल्या, की कोरोनामुळे रोजगाराचे मोठं संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या वर्षाचे मनरेगाचे बजेट ६० हजार कोटी रुपयांवरुन वाढवून एक लाख कोटी रुपये करण्यात आलं आहे. दुसरीकडे १६ योजनांतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘MSME’ अर्थव्यवस्थेचा कणा
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, मात्र, गेल्या दशकांपर्यंत त्यांना जे स्थान मिळालं नव्हतं, ते स्थान मोदी सरकारने मिळवून दिले. या क्षेत्राला मोदी सरकारने एक विशेष ओळख दिल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारने खूप वेगळ्या गोष्टी केल्या आहेत. सरकारने MSME क्षेत्राची व्याख्या खूप लवचिकपणे बदलली आहे. संसेदत एक विधेयक आणलं असून, त्यामुळे या क्षेत्राला थेट फायदा होणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.