SpreadIt News | Digital Newspaper

.. तर राज्यात पुन्हा लाॅकडाऊन करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा, नेमकं काय म्हटलेय पाहा..?

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी धोका पूर्णपणे टळलेला नाहीये. तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यास, राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

तसेच रॅली काढून गर्दी जमविणाऱ्या विरोधकांनाही नाव न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांनी चांगलेच फटकारले. रस्त्यावरील गर्दी अशीच वाढत राहिली, तर अपेक्षेपेक्षा लवकरच तिसरी लाट येईल, असेही ते म्हणाले.

Advertisement

मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की “इतर देशांत, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घेत आहोत. लहान मुलांना कोविड झाल्यास त्यांना रुग्णलयाचं वातावरण चांगले वाटावे, यासाठी हे सेंटर उभारले आहे.”

Advertisement

राजकीय पक्षांना आवाहन
“आतासुद्धा मी गर्दी पाहिली. ही गर्दी योग्य नाही. अर्थचक्र सुरू राहावे, यासाठी काही निर्बंधामध्ये शिथिलता दिलीय. कोणताही राजकीय स्वार्थ वा स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असे वर्तन करू नका,” असे आवाहन ठाकरे यांनी राजकीय पक्ष, धार्मिक, सामाजिक संघटनांना केले.

चिथावणीला दाद देऊ नका..
ते म्हणाले, की “राज्यात अजूनही ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल, तेव्हा पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल. त्यामुळे कोणीही कितीही चिथावणी दिली, भडकावलं, तरी त्याला दाद देऊ नका.”

Advertisement

कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकार सावध पावलं उचलत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement