SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

काबुलमध्ये 150 प्रवाशांचे अपहरण नि सुटका, भारतीयांचा जीव टांगणीला, नेमकं काय घडलं..?

अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यापासून अफगाणिस्तानात अराजकता माजली आहे. सत्तेची सगळी सूत्रे आता तालिबान्यांच्या हातात गेल्याने अनेक अफगाण नागरिक मिळेल त्या वाटेने जीव वाचविण्यासाठी पळत आहेत. सर्वच देशांनी आपापल्या देशवासीयांना वाचविण्यासाठी खटपट सुरु केली आहे.

एकीकडे अशी सगळी भीषण परिस्थिती असताना, भल्या सकाळीच काळजाचा थरकाप उडविणारी बातमी समोर आली. काबूलमधील हामीद करजई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून शनिवारी (ता. २१) पहाटे तालिबानींना 150 नागरिकांचे अपहरण केले असून, त्यात मोठ्या प्रमाणात भारतीय असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

सर्व भारतीयांना विमानतळापासून काही अंतरावरील ‘आलो-कोझई’ कंपनीत सुरु केलेल्या तात्पुरत्या तालिबानी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आले. ही बातमी माध्यमातून समोर येताच देशभर खळबळ उडाली.

दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्याने मात्र या बातमीचे खंडन केले होते. त्यानंतर अफगाण माध्यमांच्या हवाल्याने ‘एएनआय’ने खुलासा करताना सांगितले, की अफगाणिस्तानातील सर्व भारतीय सुरक्षित असून, त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

काबूलमधून ८५ भारतीयांची सुटका
काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने काबूलमधून ८५ भारतीयांना बाहेर काढलं होतं. हवाई दलाचे विमान भारतीय प्रवाशांना दुशान्बे, ताजिकिस्तानमध्ये सोडेल. नंतर हे भारतीय एअर इंडियाच्या विमानाने देशात परत येतील. अजून एक विमान बचावकार्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी मंगळवारी (ता. १७) सुमारे 140 लोकांना भारतात परत आणण्यात आले. त्यात भारतीय नागरिक, पत्रकार, मुत्सद्दी, दूतावासातील इतर कर्मचारी आणि भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Advertisement

‘स्पेशल अफगाणिस्तान सेल’
दरम्यान, अफगाणिस्तानात अजूनही मोठ्या संख्येनं भारतीय अडकल्याचे समोर येत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या लोकांना परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्यासाठी ‘स्पेशल अफगानिस्तान सेल’ तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून भारतीयांना परत आणले जात आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement