केबीसीच्या खेळपट्टीवर उतरणार माजी सलामीवीर, भारताचे दोन दिग्गज फलंदाज हाॅटसीटवर बसणार, कधी आहे हा भाग पाहा..
‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी.. सामान्य जनतेला कोट्याधीश होण्याचे स्वप्न दाखविणारा शो..! बाॅलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यामुळे या शोला ‘चार चाॅंद’ लागले. यंदा येत्या 23 ऑगस्टपासून ‘केबीसी’चा 13 वा सिजन सुरु होत आहे.
नेहमीप्रमाणेच अमिताभ बच्चन हेच यंदाही हा शो होस्ट करणार आहेत. दरम्यान, या शोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या माजी सलामीवीरांची जोडी KBC च्या हॉटसीटवर दिसणार आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार, सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवाग ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये दिसणार आहेत. ‘KBC-13’च्या खेळपट्टीवर ही जोडी कसा खेळ करते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
कधी दिसणार माजी सलामीवीर..?
‘केबीसी’च्या मागील पर्वात आठवड्याच्या शेवटी ‘कर्मवीर’ नावाचा एक एपिसोड होत असे. त्यात विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी पाहुणे हाॅटसीटवर बसून, सामाजिक कामासाठी योगदान देत. पण, यंदाच्या हंगामात या भागाचे नाव ‘कर्मवीर’ ऐवजी ‘फॅन्टास्टिक फ्रायडे’ असे करण्यात आले आहे.
नावाप्रमाणेच हा एपिसोड दर शुक्रवारी प्रसारित केला जाणार आहे. त्याच्या पहिल्या भागात, म्हणजेच 27 ऑगस्टला ‘केबीसी 13’च्या हॉटसीटवर सौरव गांगुली व वीरेंद्र सेहवाग विराजमान होणार आहेत.
प्रेक्षकांना ‘एन्ट्री’ मिळणार..
‘कौन बनेगा करोडपती’च्या या हंगामात अनेक बदल करण्यात आले आहेत. कोरोनामुळे गेल्या वेळी प्रेक्षकांना स्टुडिओत बसण्याची परवानगी दिलेली नव्हती. मात्र, यंदा स्टुडिओत प्रेक्षकांना ‘एन्ट्री’ मिळणार असून, त्यासाठी पुन्हा एकदा या सेटचे रुपडे पालटण्यात आले आहे.
प्रेक्षकांसह या शोमध्ये ‘ऑडियन्स पोल’ ही लाईफलाईन या हंगामात पुनरागमन करीत आहे. त्याशिवाय स्पर्धकांच्या मदतीला ‘50:50’, ‘आस्क द एस्पर्ट’ आणि ‘फ्लिप द क्वेश्चन’ या तीन लाईफ लाईन्स देखील असणार आहेत.
अमिताभ बच्चन म्हणतात…
‘केबीसी’च्या यंदाच्या पर्वाबाबत अमिताभ बच्चन म्हणाले, की ‘केबीसी’सोबत माझा संबंध 21 वर्षांचा आहे. गेल्या हंगामात स्टुडिओत प्रेक्षक नव्हते. मात्र, यंदाच्या हंगामात स्टुडिओत प्रेक्षक पुन्हा उत्साहाने परतले आहेत. त्याचा मला मोठा आनंद होतो आहे.’
‘केबीसी’चा प्रत्येक सीजन एक समृद्ध करणारा अनुभव असतो. सर्व क्षेत्रातील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे. आता हा खेळ आकर्षक आणि परिपूर्ण बनविण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सज्ज झालो असल्याचे बच्चन यांनी सांगितले.