टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांचा करार यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर संपणार आहे. त्यामुळे आतापासून भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक कोण असणार, याबाबत अटकळी बांधल्या जात आहेत. त्यातही एक नाव सातत्याने समोर येते, ते म्हणजे ‘दी वाॅल’ राहुल द्रविड..!
युवा खेळाडू घडविण्यात राहुल द्रविडचे योगदान मोठे आहे. त्याच्यामुळेच भारताची ‘बेंच स्ट्रेन्थ’ मजबूत झाली. त्यामुळे मुख्य खेळाडू नसतानाही भारताने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
गेल्या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड याचीच निवड करण्यात आली होती. त्यामुळे रवि शास्री यांच्यानंतर तोच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक असणार, असे म्हटले जात होते.
भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही द्रविडनेच मुख्य प्रशिक्षक व्हावे, असे वाटत होते. मात्र, द्रविडच्या मनात काही वेगळेच सुरु असल्याचे दिसते.
राहुल द्रविड सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख आहे. मात्र, त्याचा दोन वर्षांचा कालावधी संपल्याने बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी द्रविडने पुन्हा एकदा अर्ज केला आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदात रस नसल्याचेच दिसते.
टीम इंडियाचा कोच होण्यापेक्षा राहुल द्रविडला युवा खेळाडू घडविण्यातच जास्त रस आहे. त्यामुळेच त्याने NCA च्या प्रमुखपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. राहुलने आतापर्यंत NCAचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी शानदार काम केलेय. त्यामुळे त्याची निवड निश्चित मानली जात आहे.
विशेष म्हणजे, राहुल वगळता अन्य कोणत्याही मोठ्या व्यक्तीने आतापर्यंत NCAच्या प्रमुखपदासाठी अर्ज केलेला नाही. बीसीसीआयने अर्ज करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. मात्र, आता त्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलीय.
दरम्यान, राहुल द्रविडने या पदासाठी अर्ज केल्याने, अन्य कोणीही अर्ज करण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे दिसते. द्रविडच्या नावाची औपचारिकताच बाकी असल्याची चर्चा आहे. मात्र, टीम इंडियाचा कोच कोण होणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे.